मुंबई – आम्हाला ‘लीकेज’ सरकार म्हणतात; पण ते अडीच वर्षे ‘सिक’ (आजारी) होते. निरोप कोण कुणाला देईल, हे येणारा काळ ठरवेल. हे सगळे जनतेच्या हातात असतं. दोन वर्षे आमच्या सरकारने केलेल्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा महायुतीचे शासन आणण्याचा आमचा निश्चय आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते विधीमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधतांना बोलत होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर पुष्कळ आरोप केले होते. शिंदे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
‘मुख्यमंत्री अमावस्या-पौर्णिमेला पंचतारांकित शेती करायला जातात’, असे विधान ठाकरे यांनी केले होते. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘‘लंडनमधील पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी कि नाही ? शेतकर्याने चांगली पंचतारांकित शेती करू नये का ? नगदी पिके घेऊ नयेत का ? मी त्यांना माझ्या शेतातील सगळी फळे पाठवीन.’’