वित्तीय मान्यता मिळालेल्या विकासकामांचे कार्यादेश त्वरित काढावेत ! – पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त

पुणे – गणेशोत्सव झाल्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीनंतर त्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे अधिक काळ आचारसंहितेमध्ये गेल्यावर विकासकामांना खीळ बसेल. पुरेसा अवधी मिळणार नाही; म्हणून वित्तीय मान्यता मिळालेल्या विकासकामांचे कार्यादेश त्वरित काढावेत, अन्यथा पुरेसा निधी व्यय करण्यास मिळणार नाही, अशा सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी केल्या आहेत. ते स्थायी समितीच्या बैठकीत बोलत होते.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपलेली आहे. या कालावधीमध्ये विकासकामांसाठी पूर्वगणनपत्रक (एस्टीमेट) सिद्ध करणे, त्यास मान्यता देणे, निविदा प्रक्रिया राबवून स्थायी समितीच्या बैठकीस मान्यता घेणे आणि त्यानंतर त्वरित कार्यादेश देण्याची प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा आचारसंहितेच्या काळात विकासकामे करणे शक्य होणार नाही. पावसाळ्यात खोदाई करता येत नसल्याने विकासकामांवर मर्यादा येतात. सर्व विभागप्रमुखांनी आपापल्या वित्तीय मान्यता घेतलेल्या तातडीच्या कामांची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सप्टेंबरपर्यंत कार्यादेशही काढावेत, असे आदेशही अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.