संपादकीय : कुठे गेली राष्ट्रनिष्ठा ?

संसदेत ‘जय फिलिस्तिन’ अशी घोषणा देणारे खासदार असदुद्दीन ओवैसी

सध्या चालू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांनी खासदारपदाची शपथ घेतली. भाग्यनगरमधील एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उर्दू भाषेत शपथ घेत ‘जय फिलिस्तिन (पॅलेस्टाईन)’ अशी घोषणा दिली. यामुळे देहलीपासून गल्लीपर्यंत त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. अर्थात् अशा टीकेचा ओवैसी यांच्यासारख्यांवर काडीचाही परिणाम होत नाही. असे असले, तरी ओवैसी यांनी पॅलेस्टाईनविषयी दिलेली घोषणा मात्र त्यांच्याच राष्ट्रनिष्ठेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे आणि म्हणूनच ती राष्ट्रऐक्याला घातक म्हणावी लागेल. सार्वभौम राष्ट्राच्या एका खासदाराने संसदेत शपथ घेतांना दुसर्‍या देशाचा जयजयकार करणे, ही जाणूनबुजून केलेली कृती आहे, असे दिसते. आतापर्यंत याच ओवैसी यांनी हिंदूंवर आगपाखड करतांना ‘तुम्ही आम्हाला राष्ट्रनिष्ठा शिकवू नका. हा देश आमचा आहे’, वगैरे राणाभीमदेवी थाटात अनेकदा गर्जना केली आहे. मग ‘आता त्यांची राष्ट्रनिष्ठा कुठे गेली ?’, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. त्यांच्या या घोषणेवर भाजपच्या खासदारांनी आक्षेप घेतला; परंतु त्यांना उत्तर देण्याऐवजी ओवैसी यांनी ‘मी काहीही चुकीचे बोललेलो नाही, मग माझे वाक्य घटनाविरोधी कसे असेल ? घटनेत कुठे असे प्रावधान आहे ते दाखवा’, असे विधान उद्दामपणे केले. आता श्रीराममंदिर, श्री काशीविश्वेश्वर आणि श्रीकृष्णजन्मभूमी यांसाठी लढा देणारे ज्येष्ठ अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांनी ‘ओवैसी यांचे विधान हे घटनेचे कलम १०२ आणि १०३ चे उल्लंघन असल्याने त्यांचे सदस्यत्व रहित करावे’, अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे. खरेतर ही मागणी संपूर्ण देशाने केली पाहिजे.

ओवैसी यांची खासदारकी रहित झाली, तरच देशात कठोर संदेश जाईल आणि कुठलीही घटनात्मक पदावरील व्यक्ती अशा प्रकारची विधाने करू धजावणार नाही. असे कितपत घडेल ? याविषयी सध्या तरी शंकाच आहे. यापूर्वी काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर, शशी थरूर, नवज्योतसिंह सिद्धू, दिग्विजय सिंह आदींनी उघडउघड अनेकदा पाकिस्तानचे गुणगान केले आहे. नवज्योतसिंह सिद्धू यांनी तर पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानचे तत्कालीन लष्करशाह (जे कट्टर भारतद्वेषी आहेत) कमर बाजवा यांची गळाभेट घेतली आहे. शशी थरूर हे तर पाकिस्तानमध्ये प्रत्येक वर्षी होणार्‍या परिषदेचे ठरलेले ‘पाहुणे’ आहेत. मग या लोकप्रतिनिधींवर आजपर्यंत कुठली ठोस कारवाई झाली ? कुठलीच नाही. त्याचीच ‘री’ मग देशातील इतरही राष्ट्रघातकी आणि धर्मांध लोक ओढतांना दिसतात. देहलीतील साम्यवाद्यांचे ‘मुख्यालय’ असलेल्या जे.एन्.यू.मध्ये ‘भारत तेरे तुकडे होंगे’, अशा देशद्रोही घोषणा उघडपणे दिल्या जातात. पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट सामन्यांत पाकिस्तान जिंकला, तर फटाके फोडून आनंद साजरा केला जातो आणि भारत जिंकला, तर मात्र दगडफेक केली जाते. इतकेच काय अनेक मोर्चे, आंदोलने, मिरवणुका यांमध्ये पाकिस्तानचा झेंडा सर्रासपणे फडकावला जातो. या सर्वांवर कुठली ठोस कारवाई होते ? कुठलीच नाही. त्यामुळे आताही ओवैसी यांच्यावर कारवाई होईल, याची शाश्वती नाही. ओवैसी पॅलेस्टाईनमधील त्यांच्या धर्मबांधवांच्या पाठीशी उभे रहातात; मात्र याच पॅलेस्टाईनच्या ‘हमास’ या आतंकवादी संघटनेविषयी मौन बाळगतात, याकडे दुर्लक्ष कसे करता येईल ? या परिस्थितीवर ‘देशद्रोहासाठी कठोर कायदा करणे’, हा एकमेव उपाय आहे. जोपर्यंत कठोर उपाय योजले जात नाहीत, तोपर्यंत राष्ट्रऐक्याला भगदाड पाडणारे वठणीवर येणार नाहीत !

राष्ट्रऐक्याला भगदाड पाडणार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी देशद्रोहाविषयी कठोर कायदा होणे आवश्यक !