पालखी सोहळ्यासाठी बाँबशोधक आणि नाशक पथकांसह पोलीसयंत्रणा सज्ज !

बंदोबस्तासाठी ४ सहस्र पोलीस तैनात 

आळंदी (पुणे) – राज्यभरातून लाखोंच्या संख्येने आषाढी वारीसाठी येणार्‍या भाविकांची सुरक्षितता वारीकाळात महत्त्वाची आहे. त्याकरता पोलीस पथकाला दक्ष रहावे लागते. पालखी प्रस्थान सोहळ्याच्या वेळी कोणतीही अनुचित घटना होऊ नये, यासाठी ४ सहस्र पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून वारीसाठी पोलिसांचा बंदोबस्त संमत केला आहे. यात ५ साहाय्यक पोलीस आयुक्त, २५ पोलीस निरीक्षक, १०८ पोलीस उपनिरीक्षक, ८५० पोलीस अंमलदार, एस्.आर्.पी.एफ्.च्या (राज्य राखीव पोलीस दलाच्या) ३ तुकड्या, आर्.सी.पी. (दंगल नियंत्रण पथक) ५ पथके, ‘स्ट्रायकिंग फोर्स’च्या ३ तुकड्या, क्यू.आर्.टी.ची (जलद प्रतिसाद दलाची) १ तुकडी, बाँबशोधक पथक असणार आहे. पालखीचे प्रस्थान होईपर्यंत २ सत्रांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात येईल. यामध्ये महाद्वार येथे ३० पोलीस, मंदिरांमध्ये ७०, भराव रस्त्यावर ४० आणि प्रदक्षिणा मार्गावर १५० पोलीस तैनात रहातील.

आरोग्य विभागाची सिद्धता पूर्ण

वारीच्या काळात २४ घंटे बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभागात वारकर्‍यांना आरोग्य सुविधा दिल्या जातील. मंदिर प्रशासन देईल त्या जागेत ई.सी.जी.सह (हृदय स्पंदनालेख) १ ऑक्सिजन खाट (बेड), स्वतंत्र स्त्री रोग वैद्यकीय अधिकारी असणार आहे. शहरातील अन्य खासगी रुग्णालयांमध्ये १० खाटा राखीव ठेवल्या आहेत. वारकरी आणि भाविक यांच्या औषधोपचारांसाठी ९ ठिकाणी ‘आरोग्य बूथ’ उभे केले जाणार आहेत, अशी माहिती नोडल (विभाग) अधिकारी डॉ. सुचित्र खेडकर यांनी दिली.

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता हवी !

देहूरोड कॅन्टोन्मेंट भागातील चिंचोलीमधील पहिल्या विसाव्याच्या ठिकाणी स्वच्छता करावी, तेथील चर बुजवावेत. वारकर्‍यांच्या अन्य गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने पिंपरी-चिंचवडचे अपर तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे.

वारकर्‍यांना विनामूल्य पाण्याच्या टँकरची सुविधा !

पिंपळे गुरव (पुणे) येथील ‘मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने पालखी सोहळ्यातील ५ दिंड्यांना ५ टँकरद्वारे विनामूल्य पाणीपुरवठा केला जाणार आहे. दिंडी क्र. ११, २२१, १९७, १८ आणि श्रीगुरु बंकट स्वामी महाराज विश्वस्त मंडळ दिंडी यांना वारी संपेपर्यंत पाणीपुरवठा केला जाणार आहे.