‘१३.१२.२०२३ या दिवशी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका पू. कुसुम जलतारेआजी (सनातनच्या ९५ व्या (व्यष्टी संत, वय ८४ वर्षे) यांना सहज भेटण्यासाठी रामनाथी आश्रमातील त्यांच्या खोलीत आले होते. त्या वेळी सहज बोलतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांनी गुरूंविषयी काही मौलिक सूत्रे सांगितली. ती पुढे देत आहे.
१. वात्सल्यमूर्ती गुरुमाऊली !
‘गुरु वात्सल्यमूर्ती असल्यामुळे खरे गुरु शिष्यावर कधीच ओरडत नाहीत. जरी एखादे खरे गुरु शिष्यावर ओरडले, तरी त्याचा कार्यकारणभाव अथांग असल्यामुळे तो आपल्याला कधीच कळू शकत नाही. गुरु स्वत:च्या प्रत्येक कृतीतून शिष्याचे कल्याणच करत असतात. त्यामुळे एखाद्या साधकाचे स्वभावदोष आणि अहंकार त्याच्या लक्षात आणून दिले, तर ती गुरूंची त्या साधकावर झालेली मोठी कृपाच असते. ‘त्या एका सत्संगातून साधकाचे किती जन्मांचे प्रारब्ध फिटते’, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
२. गुरु शिष्याला बंधनमुक्त कसे करतात ?
गुरु एखादा साधक किंवा शिष्य याला मुक्त करण्यासाठी आधी त्याला त्याच्या सर्व समस्यांतून मुक्त करतात. ते त्याला नातेवाइकांपासून सोडवतात आणि त्यानंतर शिष्याचा उद्धार करतात. ‘गुरु शिष्याला नातेवाइकांपासून सोडवतात’, याचा अर्थ ‘ते नातेवाइकांना दूर लोटून द्यायला सांगत नाहीत, तर नातेवाइकांचा उद्धार आधी करून ते शिष्याच्या मनातील त्यांच्याविषयीची काळजी दूर करतात.’ त्यामुळे शिष्याची साधना चांगली होऊन पुढे त्यालाही सर्व गोष्टींतून मुक्त होता येते, उदा. एखाद्या शिष्याला आई-वडिलांची काळजी असल्यास गुरु त्याच्या आई-वडिलांना मुक्ती देतात. एखाद्याला त्याच्या परिवारातील सदस्याची काळजी असल्यास गुरु त्या सदस्यालासुद्धा साधनेचा योग्य मार्ग दाखवतात. त्यामुळे आपसूकच शिष्याच्या मनातील काळजीचे विचार न्यून होतात आणि तो चांगली साधना करू शकतो. ‘गुरूंचे साधकाला किंवा शिष्याला बंधनमुक्त करणे’, हे असे असते. ते त्याला सर्व काळजींमधून मुक्त करत असतात.
३. गुरूंनी कोरोना महामारीच्या काळात काही साधकांचा प्राण अर्पण करण्याचा टप्पा पूर्ण करून घेणे !
कोरोना महामारीच्या काळात अनेक साधकांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता अनेक वृद्ध साधकांची सेवा केली. काही वेळा तर त्यांना वृद्ध साधकांसमवेत रुग्णालयात त्यांच्या ‘वॉर्ड’मध्येच रहावे लागले; परंतु अशा साधकांना कोरोनाची बाधा झाली नाही. ‘त्या वेळी त्यांचे रक्षण कुणी केले ? गुरूंनीच ना !’ या प्रसंगातून गुरूंनी एक प्रकारे साधकांची प्राण अर्पण करण्याचीसुद्धा सिद्धता करून घेतली, हे लक्षात येते; कारण खरा शिष्य गुरूंसाठी तन-मन-धनच नव्हे, तर प्रसंगी प्राणही अर्पण करतो. त्याप्रमाणे या साधकांनी स्वतःच्या प्राणांची तमा न बाळगता साधकांची सेवा केली. त्यामुळे त्यांचा गुरूंसाठी प्राण अर्पण करण्याचा टप्पा पूर्ण झाला.’
– श्री. योगेश जलतारे, ‘सनातन प्रभात’चे समूह संपादक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१२.२०२३)