मुंबई – मुंबई परिसरातील नालासोपारा, वसई, वर्सोवा, माहीम, रामनाथ (अलिबाग) चौल यांसह विविध बंदरांच्या, तसेच गोदींच्या इतिहासाचे संकलन असलेल्या, तसेच केंद्र शासनाच्या प्रकाशन विभागाने प्रकाशित केलेल्या ‘गेटवेज टू द सी – हिस्टोरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे पार पडले. मुंबईचा सागरी वारसा सांगणार्या संग्रहालयाच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘मेरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटी’च्या पुढाकाराने हे पुस्तक संकलित करण्यात आले असून नामवंत इतिहासकार, लेखक, संशोधक, वास्तूरचनाकार यांनी लिहिलेल्या १८ प्रकरणांचा या पुस्तकात समावेश आहे.
‘बंदरांच्या विकासामुळे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून उदयास आली’, असे नमूद करून गतकाळातील भारताच्या समृद्धीचे श्रेय देशाच्या विशाल सागरी वारशाला जाते. भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी प्रयत्नशील असून देशातील बंदरांची भूमिका यांत अधिक महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे भारतातील विविध बंदरे आणि गोदी यांचा अभ्यास करणे संयुक्तिक ठरेल’, असे प्रतिपादन राज्यपाल श्री. बैस यांनी या वेळी केले.
‘गेटवेज टू द सी’ या पुस्तकाने मुंबई क्षेत्रातील आपल्या प्राचीन बंदरांचा वैभवशाली वारसा आपल्यासमोर आणला असून या पुस्तकाचा महाविद्यालये आणि विद्यापीठ यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची शिफारस आपण विद्यापिठांच्या कुलगुरूंना करू’, असेही राज्यपालांनी सांगितले.