राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे अमली पदार्थ प्रकरणात चौकशीचे आदेश !
पुणे – येथील फर्ग्युसन कॉलेज रोड (एफ्.सी.) वरील ‘लिक्विड लेजर लॉऊंज’ हॉटेलमध्ये अमली पदार्थाची मेजवानी (पार्टी) होत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. या हॉटेलमध्ये काही तरुण मध्यरात्री मेजवानीनंतर स्वच्छतागृहामध्ये अमली पदार्थ सेवन करत असल्याचे समोर आले आहे. हे मॅफेड्रीन असल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आले आहे. अनेक अल्पवयीन मुलांना मद्य दिले जात असल्याचेही समोर आले आहे. या व्हिडिओनंतर पुण्यातील हॉटेलविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य म्हणजे हे हॉटेल अतिशय वर्दळीच्या ठिकाणी आहे. (हॉटेलमध्ये अमली पदार्थ मुलांना कोण पुरवते ? यांसह संबंधित गुन्ह्यात सहभागी सर्वांची चौकशी करून कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक) आधी अल्पवयीन मुलांना सहज ‘पब’मध्ये प्रवेश, विद्यापिठात गांजा विक्री, आता हॉटेलमध्ये अमली पदार्थाचे सेवन, असे प्रकार समोर येत आहेत. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी अमली पदार्थ प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. मेजवानी झालेल्या हॉटेलचे ‘सीसीटीव्ही फुटेज’ पोलीस पडताळणार आहे. हॉटेल सील करण्यात आले असून या प्रकरणी हॉटेल मालकासह ५ जणांना कह्यात घेण्यात आले आहे. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी अमली पदार्थ प्रकरणाला शंभूराज देसाई उत्तरदायी असल्याचा आरोप केला.
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, नागरी उड्डाण – पोलीस आयुक्तांना सूचना देऊन उत्तरदायी पोलिसांना निलंबित करण्यास सांगितले आहे. सकाळी ५ वाजेपर्यंत हॉटेल चालू कसे रहाते ?
सुप्रिया सुळे, खासदार, शरद पवार गट – राजकारण सोडून अमली पदार्थाविषयी शून्य सहनशीलता राबवून कठोर कारवाई करावी. सुषमा अंधारे, ठाकरे गट- शंभूराज यांनी मंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे. केवळ शंभूराज यांच्यासाठी काम करणारे उत्पादन शुल्क अधिकारी राजपूत यांचे निलंबन झाले पाहिजे. |
संपादकीय भूमिका :विद्यार्थ्यांची अमली पदार्थांची मेजवानी करण्यापर्यंत मजल जाणे, हा मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचा दुष्परिणाम ! |