आषाढी पालखी वारीनिमित्त १ सहस्र फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध !

देहू नगरपंचायतीचे स्वच्छता अभियान

देहू (जिल्हा पुणे) – आषाढी वारीनिमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २८ जून या दिवशी देहू येथून प्रस्थान करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायतीकडून रस्ते दुरुस्ती, इंद्रायणी नदी यांसह ठिकठिकाणची स्वच्छता, डास प्रतिबंधक औषध फवारणी यांसारखी कामे चालू केली आहेत. निर्मल वारी साकारण्यासाठी वारकरी आणि भाविक यांना १ सहस्र स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. देहू नगरपंचायतीकडून वारीनिमित्त पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी ठिकठिकाणी कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. देऊळवाडा, इंद्रायणी नदी घाट परिसरातील स्वच्छता प्रतिदिन केली जात आहे. त्यासाठी ५५ कर्मचारी कार्यरत आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून २ अधिकारी आणि ९ कर्मचारी देहू नगरपंचायतीकडे वर्ग केले आहेत. पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त नगरपंचायतीतील सर्व कर्मचार्‍यांच्या सुट्या रहित केल्या असून सर्व कर्मचार्‍यांनी कार्यालयीन समयमर्यादेत उपस्थित रहावे, असे आदेश मुख्याधिकार्‍यांनी दिले आहेत.

‘दुर्घटना प्रतिसाद पथका’ची स्थापना !

आषाढी पालखी सोहळा चालू असेपर्यंत आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हास्तरावर ‘दुर्घटना प्रतिसाद पथक’ स्थापन करण्यात आले आहे. या पथकाचे प्रमुख खेड, आळंदी, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, हवेली, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यातील उपविभागीय अधिकारी हे असून उपप्रमुख म्हणून तहसीलदार काम पहातील. २१ जून या दिवशी पथकातील सदस्यांची कार्यशाळा झाली. गर्दीच्या काळात दुर्घटना होऊ नये; म्हणून किंवा दुर्घटना घडल्यास कोणत्या प्रकारे यंत्रणेकडून काम करून घ्यायचे, परस्पर समन्वय ठेवणे आदींविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका :

नगरपंचायतीकडून वारीनिमित्त विशेष सुविधा देणे योग्य आहे; परंतु नियमितची स्वच्छता तीर्थक्षेत्री नेहमीच का होत नाही ? हेही पहाणे आवश्यक !