पंजाब येथील सुवर्ण मंदिरात एका दलित हिंदु तरुणीने ‘आंतरराष्ट्रीय योग दिवसा’ला योगासने केल्याची काही छायाचित्रे सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाली. तिच्या या कृतीमुळे ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’ लागलीच संतप्त झाली. त्यांनी ‘या तरुणीने योग केल्यामुळे गुरुद्वाराचे पावित्र्य बिघडले’, अशी विपरीत भूमिका घेतली आणि पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार प्रविष्ट करण्यात आली. या तरुणीने तिच्या कृतीविषयी त्वरित क्षमाही मागितली; मात्र खलिस्तानला पाठिंबा असणार्या काहींना तिचे हे कृत्य, म्हणजे अत्यंत गंभीर अपराध वाटला आणि त्यांनी तिला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तिला जगभरातील खलिस्तान्यांकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.
येथे महत्त्वाचे म्हणजे अगदी काही मासांपूर्वीच याच गुरुद्वाराच्या परिसरात मुसलमानांच्या जमावाने नमाजपठण केले होते. त्याच्या बातम्या आणि छायाचित्रे प्रसारित झाली होती. ‘एवढा परधर्मीय जमाव नमाजपठण करतो, तर गुरुद्वाराचे पावित्र्य भंग झाले’, असे गुरुद्वाराच्या समितीला वाटले नाही का ? केवळ योग केल्यामुळे पावित्र्य भंग कसे झाले ? महत्त्वाचे म्हणजे लुधियाना येथील एका गुरुद्वाराच्या परिसरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’च्या दिवशी योगासने करवून घेण्यात आली.
२ वर्षांपूर्वीच सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाने तेथे भारताविषयी काही वाक्य उच्चारतांना तेथील सेवेकर्याने ऐकले आणि त्याने सांगितले, ‘हा पंजाब आहे, भारत नाही !’ हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. भारतातील एक राज्य असलेल्या पंजाबमधील सर्वांत मोठ्या धार्मिक स्थळी तेथील सेवेकर्याची ही मानसिकता आहे, तर इतरांची कशी असेल ? नमाजपठण करणारे मुसलमान आहेत आणि योग करणारी मुलगी हिंदु आहे, एवढाच काय तो मुख्य भेद ! म्हणजेच त्यांचा हिंदूंना आणि हिंदु धर्माला विरोध आहे, हे यातून ठळकपणे लक्षात येते. ज्या मोगल आक्रमकांनी शिखांच्या अनेक गुरूंची अत्यंत निर्घृणपणे, हालहाल करत हत्या केली, त्या शिखांच्या सध्याच्या पिढीला मुसलमान त्यांचे वाटतात, यात आश्चर्य आहे.
योगसाठी खलिस्तान्यांच्या धमक्या
अगदी काही मासांपूर्वी ‘गुरुग्रंथसाहिब’ या शिखांच्या धर्मग्रंथाची विटंबना केल्याच्या संशयातूनही २ गुरुद्वारांमध्ये तेथील सेवेकर्यांकडून विटंबनेचा संशय असलेल्या व्यक्तीची तलवारीचे वार करून हत्या करण्यात आली. एवढी धार्मिक कट्टरता असलेल्यांना नमाजपठण कसे चालते ? म्हणजेच यामागे वेगळे कारण आहे. ‘योगदिना’च्या दिवशी घडलेल्या प्रकारातील तरुणी अर्चना मकवाना यांनी झालेल्या प्रकाराविषयी क्षमा मागूनही तिला जगभरातून सातत्याने धमक्यांचे विविध संदेश, संपर्क येत आहेत. यामागे कोण आहे ? ही धार्मिक कट्टरता वगैरे काही नसून हिंदु धर्म आणि हिंदू यांच्याविषयी वाटणारी घृणा अन् द्वेष आहे. खलिस्तान्यांच्या लेखी हिंदू त्यांचे शत्रू आणि जिहादी मित्र ! ‘हिंदू-सिख भाई भाई !’, असे म्हटल्या जाणार्या पंजाबमध्ये आता काही आलबेल राहिलेले नाही. पंजाब येथील बहुतांश तरुण अमली पदार्थांच्या विळख्यात सापडले आहेत. तेथील तरुणांना अमली पदार्थांच्या आहारी नेऊन त्यांचे भविष्य बिघडवण्यात पाकची ‘आय.एस्.आय.’ गुप्तचर संस्था यशस्वी झाली आहे. आता या तरुणांमध्ये भारतविरोधी म्हणजे हिंदुविरोधी विचार प्रसारित करून भारताविरुद्ध चिथावण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या २ दशकांहून अधिक काळ आय.एस्.आय.ने पंजाबमध्ये खलिस्तानवादाला खतपाणी घातले. ‘भारताशी संघर्ष करून खलिस्तान मिळवता येईल’, अशी धारणा आय.एस्.आय.ने शिखांची केली आहे. अशा प्रकारे खलिस्तानी मानसिकता रुजवून पंजाब कह्यात घेण्याचा प्रयत्न आय.एस्.आय. कडून चालू आहे.
पंजाबमध्ये पोलिसांच्या संरक्षणात खलिस्तान समर्थनार्थ फेर्या निघतात, जाहीररित्या घोषणा देण्यात येतात. खलिस्तानी मानसिकतेच्या वाढीसाठी आय.एस्.आय., पाकिस्तान यांसह आता खलिस्तानी मानसिकतेच्या शिखांचा मोठा गट कॅनडामध्ये सिद्ध झाला आहे. तो तेथील राजकारणातही सक्रीय झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे सरकार खलिस्तान्यांच्या पाठिंब्यावरच आहे. परिणामी भारतातील खलिस्तानी मानसिकतेचे भरण-पोषण करण्यास कॅनडातील खलिस्तान्यांकडून मोठे अर्थसाहाय्य होत आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जगभरातील काही ठिकाणी हिंदूंची मंदिरे अन् भारतीय यांवर खलिस्तान्यांनी आक्रमणे केली आहेत. बंदी घातलेली संघटना ‘सिख फॉर जस्टीस’चा संस्थापक आणि खलिस्तानी आतंकवादी गुरुपतवंत सिंह पन्नू हा अमेरिकेच्या संरक्षणात राहून भारत सरकारला सातत्याने धमक्या देत आहे. कॅनडा, अमेरिका असे मोठे देश खलिस्तान्यांना पोसत असल्याने ते बिनदिक्कतपणे कार्य करतात. त्यामुळे त्यांचे मनसुबे आणि शक्ती वाढली आहे. विदेशात राहून भारतात खलिस्तानी चळवळ चालवू शकतो, असा विश्वास त्यांना वाटतो. परिणामी आता भारतातील त्यांचे पाठीराखे, खलिस्तानी उघड उघड हिंदुविरोधी भूमिका घेऊ लागले आहेत. त्याचे लोण शिखांच्या गुरुद्वारापर्यंत पोचले आहे. या हिंदुविरोधी मानसिकतेचाच भाग, म्हणजे योगासने करणार्या अर्चना मकवाना यांना झालेला विरोध आहे. प्रत्येकाच्या धार्मिक स्थळाचे पावित्र्य जपले जाणे, हे आवश्यकच आहे, त्यात काही दुमत नाही; पण दोन भिन्न धर्मियांविषयी वेगळी भूमिका घेतली जाणे, हे अनाकलनीय आहे. नियम लावला, तर तो दोघांनाही समानच लावावा.
लोकसंख्येचा विचार केला, तर पंजाबमध्ये शिखांच्या खालोखाल हिंदूंची लोकसंख्या अधिक आहे. तेथेही हिंदु संघटना कार्यरत आहेत; मात्र हिंदूंच्या संघटनांमध्ये दहशत बसवण्याचा प्रयत्नही खलिस्तान्यांकडून होत आहे. गतवर्षीच एका हिंदु संघटनेच्या प्रमुखाला पंजाबमध्ये गोळ्या घालून ठार करण्यात आले, त्यापूर्वीही अन्य हिंदु संघटनांच्या प्रमुखांवर जीवघेणी आक्रमणे करण्यात आली. ‘पंजाबमध्ये केवळ हिंदु संघटनांच्या प्रमुखांवरच आक्रमणे होत आहेत, अन्य पंथियांच्या प्रमुखांवर नाहीत’, हे लक्षात घेण्याचे सूत्र आहे. पंजाबमध्ये ख्रिस्ती मिशनरी तेथील शिखांचे मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती पंथात फसवून धर्मांतर करत आहेत, तरी ख्रिस्त्यांवर आक्रमण झाल्याचे ऐकिवात नाही. शिखांच्या धर्मांतराचे अनेक व्हिडिओ प्रसारित होत आहेत, तरी त्याचा ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’ने एका शब्दाने निषेध केल्याचे ऐकिवात नाही. बहुसंख्य हिंदूंच्या भारतात राहून हिंदूंना धमकावले जाते, हिंदु संस्कृतीच्या पालनासाठी आक्षेप घेतला जाणे, हे हिंदूंची अतीसहिष्णुता आणि षंढपणा यांचा परिणाम आहे. हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने हिंदुविरोधी कृतींना विरोध केल्यास आपोआपच त्यांचा धाक निर्माण होणार आहे. काळाची पावले ओळखून हिंदूसंघटन करणेच आवश्यक आहे, तसेच सरकारने खलिस्तानी चळवळीला नेस्तनाबूत करण्याच्या दृष्टीने अंतिम पावले उचलावीत !
योगविरोधी भूमिका घेणारी ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’ खलिस्तानी मानसिकता जोपासत नाही का ? |