Suraj Revanna Arrested : प्रज्‍ज्‍वल रेवण्‍णा याचा आमदार भाऊ सुरज रेवण्‍णा यालाही लैंगिक अत्‍याचाराच्‍या प्रकरणी अटक

आमदार सुरज रेवण्‍णा

हासन (कर्नाटक) – शेकडो महिलांच्‍या लैंगिक शोषणाच्‍या प्रकरणी अटक करण्‍यात आलेले जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा माजी खासदार प्रज्‍ज्‍वल रेवण्‍णा याला अटक करण्‍यात आल्‍यानंतर आता त्‍याचा भाऊ आमदार सुरज रेवण्‍णा यालाही लैंगिक अत्‍याचाराच्‍या प्रकरणात अटक करण्‍यात आली आहे. पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यानेच केलेल्‍या तक्रारीनंतर पोलिसांनी सुरज याला अटक केली. तो विधान परिषदेचा आमदार आहे. हासन जिल्‍ह्यातील होलेनारसीपुरा येथील पोलीस ठाण्‍यात सुरज याच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदण्‍यात आला होता.

१. तक्रारीनुसार १६ जून या दिवशी सुरज रेवण्‍णा याने या तरुण कार्यकर्त्‍याला शेतघरावर बोलावले होते. येथे या कार्यकर्त्‍यावर लैंगिक अत्‍याचार करण्‍यात आले. तसेच त्‍याला मारहाणही करण्‍यात आली.

२. पीडित तरुणाने तक्रारीत म्‍हटले, ‘सुरजने लैंगिक अत्‍याचार केल्‍यानंतर मला राजकारणात चांगले पद देण्‍याचे आणि माझे राजकीय बस्‍तान बसवण्‍याचे आमीष दाखवले.’

३. दुसरीकडे सुरज रेवण्‍णा आणि त्‍याचा सहकारी शिवकुमार यांनी पीडित तरुणाच्‍या विरोधातच धमकावणे अन् खंडणी मागण्‍याचा गुन्‍हा नोंदवला होता. ‘लैंगिक अत्‍याचाराचा खोटा गुन्‍हा प्रविष्‍ट (दाखल) करून तुम्‍हाला अपकीर्त करू’, अशी धमकी पीडित तरुणाने दिली असल्‍याचे सुरज याने प्रविष्‍ट केलेल्‍या तक्रारीत म्‍हटले होते.