पुणे – बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, तसेच ससून सर्वोपचार रुग्णालय येथे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना मे मध्ये सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला; मात्र तीनच आठवड्यांत डॉ. म्हस्के यांच्याकडील कार्यभार काढून तो डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे दिला आहे.
कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी ससूनच्या २ डॉक्टरांना गेल्या महिन्यात अटक झाली. हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले नसल्याचा आरोप ठेवून तत्कालीन अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आला; मात्र त्यांच्याकडूनही तो काढून घेऊन मुंबई येथील जे.जे. महाविद्यालयातील अस्थी व्यंगोपचार विभागातील प्राध्यापक डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. प्रशासकीय कारणामुळे हा पालट केल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने म्हटले आहे.
वारंवार अधिष्ठाता पालटण्यात आल्याने बीजे वैद्यकीय महाविद्यालय, तसेच ससून येथील व्यवस्थापनावर परिणाम होत आहे. कर्मचारी आणि अधिकारी यांवर कुणाचाच वचक नसल्याची स्थिती असून रुग्णसेवेकडे दुर्लक्ष होत आहे. डॉक्टर संजीव ठाकूर यांना ललित पाटील पलायन प्रकरणी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पदमुक्त केले होते.
संपादकीय भूमिका :वर्षभरात ४ अधिष्ठाते पालटले जाणे, हे रुग्णालय व्यवस्थापनेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. जनतेच्या जिवाशी संबंधित असणारे वैद्यकीय क्षेत्रही भ्रष्ट होणे हे दुर्दैवी ! |