माऊलींच्या पालखी मार्गांवर साजरी होणार ‘वारी साक्षरतेची’ !

निरक्षर व्यक्तींना करण्यात येणार साक्षर

आळंदी (पुणे) – १५ वर्षे आणि त्यापुढील वयाच्या निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी पालखी मार्गावर ‘वारी साक्षरतेची’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. ‘नवभारत साक्षरता केंद्र’ पुरस्कृत ‘उल्हास उपक्रमा’चा प्रसार आणि प्रचार ‘आळंदी देवस्थान’च्या साहाय्याने साजरा केला जाणार आहे.

माऊलींच्या पालखी सोहळ्यात साक्षरतेचा प्रसार आणि प्रचार आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर करण्यात येणार आहे. सोहळ्यातील सर्व दिंडीप्रमुखांना याविषयी सविस्तर सूचना देण्याचे दायित्व आळंदी देवस्थानावर देण्यात आले आहे. पालखी सोहळा आणि वारी संपल्यानंतर वारकरी जेव्हा स्वत:च्या मूळ गावी जातील, तेव्हा तेथील जवळच्या शाळेशी संपर्क साधून निरक्षर लोकांची ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. संबंधित शाळा निरक्षर स्वयंसेवकांसमवेत जोडणी करणार आहेत. त्यानंतर निरक्षरांना शिकवणे चालू होईल.

या अभियानासाठी शासनाकडून नेमण्यात आलेल्या गाड्या (व्हॅन), शिक्षक, स्वयंसेवक यांच्याकडून पथनाट्य, फलक, घोषवाक्यांचा प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे. सासवड आणि लोणंद या ठिकाणांच्या मुक्कामाच्या ठिकाणी निरक्षरांची नोंदणी शाळांच्या साहाय्याने करण्यात येणार आहे.