पुणे येथील चांदणी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प’ उभारणार !

पुणे – येथील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी पुणे महापालिकेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या २० फूट उंचीच्या पुतळ्याचा समावेश असलेल्या ‘हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्पा’ची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी स्थायी समितीने ६ कोटी ५६ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.

चांदणी चौकाकडून वारजेकडे जाणारा रस्ता आणि सातार्‍याकडून मुंबईकडे जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यामध्ये महापालिकेला ५ सहस्र ५४२ चौरस मीटर मोकळी जागा उपलब्ध झालेली आहे. याठिकाणी ‘हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प’ उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा वास्तूविशारद सतीश कांबळे यांनी सिद्ध केला असून त्यास महापालिकेकडून मान्यता देण्यात आली आहे. या ‘हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्पा’मध्ये ‘स्टोन क्लाऊडिंग’चे प्रवेशद्वार, कमळाच्या पाकळ्यांच्या आकारातील पाण्याचे कारंजे, १७ फूट उंचीचा चौथरा असून त्यावर २० फूट उंचीचा छत्रपतींचा ब्राँझचा (पितळेचा) पुतळा, स्मारकाच्या भोवती पिवळ्या आणि लाल रंगाच्या दगडांचा पादचारी मार्ग, मुख्य प्रवेशद्वारासह दुसर्‍या बाजूला एक छोटे प्रवेशद्वार, असे हे शिल्प उभारले जाणार आहे.