Swiss Bank Report : स्विस बँकेत भारतियांनी ठेवलेल्या पैशांत मोठी घट

नवी देहली – स्विस बँकेत भारतियांनी ठेवलेल्या पैशांत मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लोक आणि आस्थापने यांनी स्थानिक शाखा अन् इतर वित्तीय संस्था यांच्या माध्यमातून स्विस बँकांमध्ये जमा केलेल्या पैशांत वर्ष २०२३ मध्ये ७० टक्क्यांनी घट झाली आहे. हा आकडा ४ वर्षांत नीचांकी, म्हणजे ९ सहस्र ७७१ कोटी रुपयांवर आला आहे. वर्ष २०२१ मध्ये स्विस बँकेतील भारतियांचा पैसा १४ वर्षांतील उच्चांकावर होता. त्या वेळी ३ लाख ५८ सहस्र कोटी रुपयांहून अधिक रक्कम भारतियांची होती.

१. स्विस नॅशनल बँकेच्या अहवालातील माहितीनुसार, भारतियांची स्विस बँकेतील रक्कम वर्ष २००६ मध्ये एकूण ६ लाख कोटी रुपयांहून अधिक इतकी विक्रमी होती. यानंतर वर्ष २०११, २०१३, २०१७, २०२० आणि २०२१ या वर्षांमध्ये रक्कम वाढली होती.

२. मागील २ दशके स्विस बँकेतील भारतियांचा पैसा सातत्याने न्यून होत आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. मुख्यत्वे रोखे आणि इतर विविध वित्तीय साधने यांमध्ये असलेल्या निधीमध्ये झालेली घट, हे एक कारण आहे. या घसरणीचे कारण रोख्यांच्या किमतीत झालेल्या घसरणीसह आर्थिक साधनांच्या स्वरूपातील गुंतवणुकीत झालेली घट, हेही असल्याचे सांगितले जात आहे.

स्विस बँकेत गोपनीयता कायदा !

स्विस बँकेत भारतियांचा पैसा आहे, ही माहिती मिळते; परंतु या पैशांचा मालक कोण आहे ?, ही माहिती दिली जात नाही. याचे कारण तेथील गोपनीयता कायद्याचे कलम ४७ आहे. यामुळे या बँकेत खाते उघडणार्‍यांची माहिती दिली जात नाही.ज्या लोकांनी किंवा आस्थापनाने बँकेत रक्कम ठेवली आहे, त्याची माहिती कोणत्याही कारणासाठी बँक कधीच देत नाही.

संपादकीय भूमिका

स्विस बँकांमध्ये भारतियांचा मोठ्या प्रमाणात काळा पैसा ठेवण्यात आला आहे, असे अनेक वर्षे जनतेला सांगितले जात आहे, तसेच ‘हा पैसा परत भारतात आणू’, अशी आश्‍वासने जनतेला देण्यात आली; मात्र यातील एक रुपयाही भारतात परत आलेला नाही, ही वस्तूस्थिती आहे.