शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजपसमवेत कदापि जाणार नाही ! – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

मुंबई – ‘लोकसभा निवडणुकीतील यशानंतर उद्धव ठाकरे भाजपसमवेत जाणार’, असा अपप्रचार केला जात आहे. आईसमान शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजपसमवेत कदापि जाणार नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्त मुंबईमध्ये घेतलेल्या मेळाव्यात केले. या वेळी व्यासपिठावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार, आमदार आणि नेते उपस्थित होते.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही; पण चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांच्या समवेत सत्ता स्थापन करून भाजपने हिंदुत्व सोडले आहे. निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वापरून यश मिळवल्याचे सांगणार्‍यांनी विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र, ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह न वापरता मैदानात उतरून दाखवा. मग कुणाच्या यशाचा दर अधिक आहे, हे पहा ! आत्मविश्वास आणि अहंकार यांत भेद आहे. आमच्यात ‘आत्मविश्वास’ आणि मोदी यांच्यात ‘अहंकार’ आहे. शिवसेनेतील फुटीनंतर जनतेच्या न्यायालयातील लढाई आम्ही जिंकलो. आमदारांच्या अपात्रतेवर पुढचा दिनांक देण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाने लवकर निर्णय द्यावा, अशी प्रार्थना आहे. लोकशाही संपवण्याचा विडा उचलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाने आवर घालावा. ’’