महाराष्ट्रात राबवली जाणार ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ योजना 

मुंबई, १९ जून (वार्ता.) – महाराष्ट्रात १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ ही योजना राबवण्यात येणार आहे. नागरिकांना वृक्ष लागवडीसाठी उद्युक्त करण्यासाठी सवलतीच्या दराने रोपांचे वितरण करण्यात येणार आहेत. शासकीय पडीक क्षेत्र, गायरान क्षेत्र, शेतीचे बांध, रेल्वेच्या दुतर्फा, कालव्याच्या दुतर्फा, सामूहिक पडीक क्षेत्र आदी ठिकाणी वृक्षांची लागवड करण्यासाठी शासनाकडून शेतकरी आणि वृक्षप्रेमी यांना योग्य दरात रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत, यासाठी शाळा अन् महाविद्यालये यांच्या परिसरात रोपांची लागवड करण्यासाठी मागणी घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.