Militants Fire CRPF Bus : मणीपूरमध्ये आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांची बस पेटवली !

इंफाळ – मणीपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांना घेऊन जाणार्‍या बसला आतंकवाद्यांनी आग लावली. अग्नीशमन दलाने तातडीने आग विझवल्याचे पोलिसांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी कांगपोकपी पोलीस ठाण्यात अज्ञात आतंकवाद्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कुकी आतंकवाद्यांचे वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यातील काही संशयितांचे अन्वेषण   केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सैनिकांना घेऊन जाणारी बस भाड्याने घेतली होती. ती बस मैतेई समुदायातील एका व्यक्तीच्या नावावर होती, असे पोलिसांनी सांगितले. गेल्या आठवड्यात बिष्णुपूर जिल्ह्यात दोन ट्रक जाळण्यात आले होते.

मणीपूरमध्ये हिंसाचार पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई करणार ! – गृहमंत्री अमित शहा

अमित शहा

मणीपूरमधील हिंसाचार आणि सुरक्षाव्यवस्था यांविषयी गृहमंत्री अमित शहा यांनी १७ जूनला देहलीत बैठक घेतली. ‘गृह मंत्रालय मैतेई आणि कुकी या दोन्ही समुदायांशी चर्चा करील’, असे या बैठकीत निश्‍चित करण्यात आले. गृहमंत्री शहा यांनी राज्याचे मुख्य सचिव विनीत जोशी यांना विस्थापित लोकांसाठी योग्य आरोग्य, शिक्षण आदी सुविधा पुरवून त्यांचे पुनर्वसन सुनिश्‍चित करण्याचे निर्देश दिले. गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मणीपूरमध्ये शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी सैन्य तैनात केले जाईल, तसेच मणीपूरमध्ये हिंसाचार पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

राज्यपाल अनुसुईया उईके यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मणिपूरमधील परिस्थितीविषयी ही उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, गुप्तचर विभागाचे प्रमुख तपन डेका, सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे, मणीपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह, मुख्य सचिव विनीत जोशी, मणिपूरचे पोलीस महासंचालक राजीव सिंह आणि आसाम रायफल्सचे महासंचालक  प्रदीप चंद्रन नायर उपस्थित होते.