Vasai Murder : वसई येथे भर रस्‍त्‍यात प्रियकराकडून प्रेयसीची हत्‍या !

लोकांकडून बघ्‍याची भूमिका


वसई – भर रस्‍त्‍यात प्रियकर रोहित यादव (वय २९ वर्षे) याने प्रेयसी आरती यादव हिच्‍यावर लोखंडी पान्‍याने वार करून तिची हत्‍या केली. ही घटना १८ जून या दिवशी सकाळी घडली. हत्‍येनंतर आरोपी घटनास्‍थळीच बसून होता. त्‍याला पोलिसांनी अटक केली आहे.

प्रेयसी अन्‍य मुलाशी बोलत असल्‍याच्‍या संशयावरून दोघांमध्‍ये भांडणे होत असत. काही दिवसांपूर्वी आरती हिने रोहितशी असलेले नाते संपुष्‍टात आणले होते. त्‍यामुळे तो चिडला होता. सकाळी ती कामावर जात असतांना त्‍याने तिला अडवले आणि शाब्‍द़िक वाद झाल्‍यावर तिच्‍यावर लोखंडी पान्‍याने वार केले. यामुळे ती खाली पडली. काही वेळानंतर त्‍याने तिच्‍यावर पुन्‍हा वार केले. यात ती ठार झाली.

समाजातील माणुसकी नष्‍ट झाल्‍याचे दर्शवणारी घटना !

सकाळची वेळ असल्‍याने रस्‍त्‍यामध्‍ये प्रचंड गर्दी होती. रोहित यादव मुलीवर वार करत असतांना लोक त्‍याचा व्‍हिडिओ काढत होते. कुणीही मुलीला वाचवण्‍यासाठी साहाय्‍य केले नाही. ‘लोकांनी पुढाकार घेतला असता, तर आरतीचे प्राण वाचले असते’, असे पोलिसांनी सांगितले. (असा संवेदनाशून्‍य समाज काय कामाचा ? – संपादक) 

 

संपादकीय भूमिका

अशी विकृत मनोवृत्ती असणार्‍यांवर कठोर कारवाईच व्‍हायला हवी !