पुणे – बांधकाम पूर्ततेच्या दिनांकाची समयमर्यादा न पाळल्यामुळे राज्यातील १ सहस्र ७५० गृहप्रकल्पांची नोंदणी ‘महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणा’ने (महारेरा) स्थगित केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ४६३ गृहप्रकल्पांचा समावेश आहे. या अपूर्ण गृहप्रकल्पांचे ‘बँक खाते’ (अधिकोष खाते) बंद करण्यात आले असून सदनिकांचे विज्ञापन करण्यासह प्रकल्पातील सदनिकांच्या विक्री-नोंदणीवर बंदी घातली आहे.
राज्यातील विकासकांना गृहप्रकल्पांची नोंदणी ‘महारेरा’कडे करणे बंधनकारक आहे. नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करतांना गृहप्रकल्प पूर्ण करण्याचा दिनांक नोंदवावा लागतो. तो अपूर्ण असल्यास ‘महारेरा’कडून समयमर्यादा वाढवून घ्यावी लागते किंवा नोंदणी रहित करावी लागते. समयमर्यादेनंतर अपूर्ण गृहप्रकल्पाला ‘लॅप्स’ (अर्धवट) सूचीमध्ये टाकून त्याची नोंदणी रहित होते. राज्यातील अशा गृहप्रकल्पांना ‘लॅप्स’ सूचीमध्ये टाकून त्यांची नोंदणी रहित केली आहे, तर नियमांचा भंग केल्याविषयी आणखी १ सहस्र १३७ प्रकल्पांवर कारवाई होणार आहे. त्यांची सूची ‘महारेरा’च्या संकेतस्थळावर असून गुंतवणूक करतांना ग्राहकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन ‘महारेरा’ने केले आहे.