पक्षाने दायित्व दिल्यास स्थानिक राजकारणात येऊ ! – केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक

श्रीपाद नाईक

पणजी, १७ जून (वार्ता.) – पक्षाने दायित्व दिल्यास स्थानिक राजकारणात येण्यास मी सिद्ध आहे. नशिबात असेल, तर मुख्यमंत्रीपदही मिळेल, असा दावा केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केला. गोवा मराठी पत्रकार संघाच्या वतीने ‘गुज’ कार्यालयात आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी हे भाष्य केले. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी ‘ही माझी शेवटची निवडणूक आहे’, असे लोकसभा निवडणुकीच्या वेळी घोषित केले होते. याला उत्तर देतांना नाईक म्हणाले, ‘‘मी माझी भूमिका मांडलेली आहे; परंतु त्याचबरोबर पक्ष जे काही दायित्व देईल, ते स्वीकारण्याची माझी सिद्धता आहे. उद्या स्थानिक राजकारणात उतरण्यास सांगितल्यास तेही करण्यास मी सिद्ध आहे.’’

तमनार वीजवाहिनी प्रकल्पाला विरोध करणार्‍यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करीन !

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक पुढे म्हणाले, ‘‘राज्यात मुबलक प्रमाणात वीजपुरवठा होत नसेल, तर राज्याचा विकास होणे अशक्य आहे. यामुळे तमनार वीजवाहिनी प्रकल्पाला विरोध करणार्‍यांचे मी मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रकल्पामुळे पर्यावरणाची होणारी हानी सर्व संबंधितांच्या सहकार्याने अल्प करता येते. तमनार प्रकल्पावरून पुढील आठवड्यात गोवा सरकारसमवेत बैठक होणार आहे. यासंबंधी केंद्राने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असल्यास तसेही करता येईल.’’

केंद्रीय राज्यमंत्री पदावर समाधानी

‘केंद्रीय राज्यमंत्री पदावर आपण समाधानी आहात का ?’, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, ‘‘मी राज्यमंत्री पदावर समाधानी आहे आणि या पदावरून जनहितासाठी पुष्कळ काही करण्याची संधी उपलब्ध आहे; मात्र लोकांना मला मोठे दायित्व दिले जाईल, अशी अपेक्षा होती. लोकांनी अशी अपेक्षा करणेही चुकीचे नाही.

दक्षिण गोव्यात धर्माच्या आधारावर मतदान झाले; मात्र धर्म राजकारणापासून दूर ठेवणेच योग्य ! – श्रीपाद नाईक

लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात धर्माच्या आधारावर मतदान झाले. भाजप दक्षिण गोवा निवडणूक हरण्याला हेसुद्धा एक कारण आहे. वास्तविक आपले राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. कोणत्याही धर्माने राजकारणावर थेट प्रभाव पाडणे चुकीचे आहे. काही लोक भाजपला साहाय्य करत होते; मात्र त्यांना वरून आदेश आल्याने त्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला नसेल, तर ते योग्य नव्हे. धर्माच्या हस्तक्षेपामुळे राजकारण गढूळ होणार आहे, असा दावा केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतांना केला.