छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना आणि वैष्णोदेवी यात्रेकरूंवर झालेले आतंकवादी आक्रमण यांचा निषेध !

हडपसर (पुणे) येथे सहस्रो शिवप्रेमींचा हिंदु जनआक्रोश मशाल मोर्चा !

हडपसर येथील हिंदु जनआक्रोश मोर्च्यात सहभागी सहस्रो शिवप्रेमी

हडपसर (पुणे) – ससाणेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर एका समाजकंटकाने दगड भिरकावून केलेली विटंबना, तसेच वैष्णोदेवी यात्रेकरूंवर झालेले आतंकवादी आक्रमण, यांच्या निषेधार्थ १६ जून या दिवशी ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘हिंदु जनआक्रोश मशाल मोर्चा’ काढण्यात आला. हडपसर आणि पंचक्रोशीतील सहस्रो शिवप्रेमींनी या मोर्च्यात सहभाग घेतला. भगव्या ध्वजाचे पूजन करून मोर्चाला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचा मोर्च्यात सहभाग होता. संपूर्ण मोर्च्यामध्ये शिवभक्तांनी अखंड घोषणा दिल्या. हातामध्ये भगवे ध्वज आणि डोक्यावर भगवी टोपी असलेल्या शिवप्रेमींनी हडपसर भाग भगवेमय केला. गाडीतळ ते ससाणेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, असा मोर्च्याचा मार्ग होता. मोर्च्याच्या शेवटी श्री. मिलिंद एकबोटे, श्री. रवींद्र पडवळ, श्री. पंडित दादा मोडक आणि ह.भ.प. संग्राम बापू भंडारी यांनी शिवभक्तांना मार्गदर्शन केले.

हडपसर येथील हिंदु जनआक्रोश मोर्च्यात सहभागी सहस्रो शिवप्रेमी

सर्वच वक्त्यांनी ‘आरोपीला कठोर शिक्षा व्हावी’, अशी मागणी पोलीस-प्रशासनाकडे केली. ‘कार्य करतांना कार्यकर्त्यांना येणार्‍या समस्या, त्यांना होणारा विरोध थांबायला हवा. कार्यकर्त्यांना सहकार्य व्हायला हवे’, अशा मागण्याही वक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केल्या. भाषणानंतर गोरक्षक श्री. ऋषिकेश कामथे यांनी सामूहिक शिववंदना घेऊन मोर्च्याची सांगता झाली. संबंधित समाजकंटकांविरुद्ध स्थानिक नगरसेवक श्री. योगेश ससाणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.