जपानमध्ये पसरले रुग्णांचे मांस खाणारे जीवाणू :  ९७७ रुग्ण आढळले !

टोकियो (जपान) – जपानमध्ये एक नवीन धोकादायक आजार समोर आला आहे. यामध्ये ‘बॅक्टेरिया’ रुग्णाच्या शरिरातील मांस खातात. ‘स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम’ (एस्.टी.एस्.एस्.) असे या आजाराचे नाव आहे.  या रोगाचा संसर्ग झाल्यानंतर ४८ घंट्यांत रुग्णाचा मृत्यू होतो. जपानमध्ये आतापर्यंत या रोगाची ९७७ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

हा रोग ‘ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकस (जी.ए.एस्.) बॅक्टेरिया’मुळे होतो. हा रोग लहान मुले आणि वृद्ध यांच्यासाठी अधिक धोकादायक आहे. याचा संसर्ग झालेल्या रुग्णांना प्रथम पायांना सूज येते आणि घसा खवखवण्याचा त्रास होतो. यासह शरीर दुखणे, ताप, अल्प रक्तदाब, ‘नेक्रोसिस’ (शरिरातील टुश्यू मरणे), श्‍वास घेण्यास त्रास होणे, अवयव निकामी होणे यांसारख्या समस्याही उद्भवतात, असे टोकियो येथील महिला डॉक्टर केन किकुची यांनी सांगितले. किकुची यांनी लोकांना वारंवार हात धुण्याचे आणि उघड्या जखमांवर त्वरित उपचार करण्याचे आवाहन केले.

हा रोग आता युरोपातील ५ देशांमध्ये पसरला आहे. यामध्ये ब्रिटन, फ्रान्स, आयर्लंड, नेदरलँड आणि स्वीडन यांचा समावेश आहे. जपानी डॉक्टर हायरमथ म्हणाले की, या रोगाशी लढण्यासाठी आरोग्य अधिकारी सतत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. लोकांना जागरूक करण्यासाठी मोहिमा राबवल्या जात आहेत. या आजाराचे गांभीर्य आणि धोके समजावून सांगितले जात आहेत.