श्री गायत्रीदेवीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

‘१७.६.२०२३ या दिवशी ‘गायत्री जयंती’ झाली. त्या निमित्ताने ही लेखरूपी पुष्पे श्री गायत्रीदेवीच्या चरणी सविनय अर्पण करत आहे.

श्री गायत्रीदेवी

१. श्री गणेशाला साहाय्य करण्यासाठी ब्रह्मदेवाने गायत्रीदेवीची निर्मिती करणे : ‘सत्ययुगाचा आरंभ होण्यापूर्वी ब्रह्मदेवाने देवतांची निर्मिती केली. सत्ययुगाला आरंभ झाल्यानंतर देवतांचे तेज मनुष्यापर्यंत पोहोचेना; कारण देवता अधिक प्रमाणात निर्गुण स्वरूपात होत्या. देवतांमध्ये असणार्‍या निर्गुण तत्त्वाचे रूपांतर सगुण तत्त्वामध्ये करण्यासाठी श्री गणेशाला एका शक्तीच्या साहाय्याची आवश्यकता होती. त्यामुळे ब्रह्मदेवाने सरस्वती आणि सवितृ या देवतांच्या संयुक्त तत्त्वांपासून गायत्रीदेवीची निर्मिती केली.’

सुश्री (कु.) मधुरा भोसले

२. गायत्री शब्दाचा अर्थ : ‘गायत्री शब्दाच्या व्युत्पत्ती आहेत – ‘गायन्तं त्रायते ।’, म्हणजे ‘गायन केल्याने (मंत्र म्हटल्याने) रक्षण करते ती’ आणि ‘गायंतं त्रायंतं इति ।’ म्हणजे सतत गात गेल्यामुळे जी शरिराला गायला लावते  (शरीरात मंत्राची सूक्ष्म स्पंदने निर्माण करते.) आणि जी तारण्याची शक्ती उत्पन्न करते (रक्षण करते), ती गायत्री होय.’

– संदर्भ (सनातन-निर्मित ग्रंथ : मंत्रयोग)

३. अन्य नावे : अथर्ववेदात गायत्रीला ‘वेदमाता’ म्हटले आहे. गायत्रीदेवीची उत्पत्ती सरस्वतीपासून झालेली असल्यामुळे काही ठिकाणी तिचा उल्लेख ‘सावित्री’ असाही केला जातो. गणेश गायत्री, सूर्य गायत्री, विष्णु गायत्री आदी प्रचलित असणार्‍या गायत्रीमंत्रांच्या नावानेही गायत्रीला संबोधले जाते.

४. निवास : तिचा निवास ब्रह्मलोकापासून सूर्यलोकाकडे जाणार्‍या मार्गात आहे. हा ब्रह्मलोकाचा उपलोक असून त्याला ‘गायत्रीलोक’ असे म्हणतात. तेथे अखंड वेदमंत्रांचा जयघोष चालू असतो आणि तेथे सोनेरी रंगाचा प्रकाश सर्वत्र पसरलेला असतो. तेथे रात्र कधीच होत नाही. तेथील वातावरण उत्साहवर्धक आणि आल्हाददायी आहे. गायत्री उपासकांना मृत्यूनंतर गायत्रीलोकांत स्थान प्राप्त होते. काही सूर्याेपासकांनाही या लोकात स्थान मिळते.

५. श्री गायत्रीदेवीमधील त्रिगुणांचे प्रमाण (टक्के)

५ अ. सत्त्व – ७०

५ आ. रज – २०

५ इ. तम – १०

संत आणि देवता यांच्यातील त्रिगुणांच्या प्रमाणामध्ये असणारा भेद

‘संत देहधारी असेपर्यंत त्यांच्यातील त्रिगुणांचे प्रमाण हे सूक्ष्म आणि सगुण-निर्गुण स्तरावरील असते, तर देवता या सूक्ष्मतर स्तरावर कार्यत असल्यामुळे त्यांच्यातील त्रिगुणांचे प्रमाण हे सूक्ष्मतर आणि निर्गुण-सगुण स्तरावरील असते.

टीप  १- देवतांना स्थूल देह नसल्यामुळे त्यांच्यामध्ये पृथ्वी आणि आप या तत्त्वांचे प्रमाण न्यूनतम आहे. तसेच त्यांचे सूक्ष्म रूप कार्यरत असल्यामुळे त्यांच्यामध्ये तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक आहे.

टीप  २ – संतांना व्यष्टी स्तरावर उर्वरित साधना करून मोक्षप्राप्ती करण्यासाठी आणि समष्टी स्तरावर पृथ्वीवरील समस्त जिवांना साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करून त्यांचे कल्याण करण्यासाठी काही वेळा ईश्वरेच्छेने पृथ्वीवर पुनर्जन्म घ्यावा लागतो. पृथ्वीवर मनुष्याचे कल्याण करण्यासाठी किंवा विशिष्ट प्रकारच्या आसुरी शक्तीचा विनाश करण्यासाठी काही देवता अंशावतार घेऊन सगुण रूप धारण करतात. देवतांचे हे अंशावतार तात्कालिक असल्यामुळे कार्यसिद्धी होताच देवता अवतार समाप्ती करून सगुण देह सोडून पुन्हा निर्गुणामध्ये, म्हणजे देवतांच्या मूलतत्त्वामध्ये विलीन होतात. त्यामुळे त्यांना पुनर्जन्म नसतो.

६. क्षमता प्रमाण (टक्के)

६ अ. उत्पत्ति – ६०

६ आ. स्थिती – ३०

६ इ. लय – १०

७. शक्ती

७ अ. प्रगट शक्तीचे प्रमाण (टक्के) : ७०

७ आ. शक्तीचा प्रकार

७ आ १. तारक शक्तीचे प्रमाण (टक्के) : ७०

७ आ १ अ. मारक शक्तीचे प्रमाण (टक्के) : ३०

७ आ २. सगुण शक्ती प्रमाण (टक्के) : ५०

७ आ २ अ. निर्गुण शक्ती प्रमाण (टक्के) : ५०

८. मूर्तीविज्ञान : गायत्रीदेवीची मूर्ती दोन प्रकारे करतात.

८ अ. पहिले रूप : ‘गायत्रीदेवी धन आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असणार्‍या लाल कमळावर विराजमान असते. तिला पाच मुखे असतात. त्यांची नावे अनुक्रमे ‘मुक्ता, विद्रुमा, हेमा, नीला आणि धवला’ अशी आहेत. ती दश नेत्रांनी दशदिशांचे अवलोकन करत असते. तिच्या आठ हातांमध्ये शंख, सुदर्शनचक्र, परशु, पाश, जपमाळ, गदा, कमळ आणि पायसपात्र (देवीला नैवेद्य रूपाने दाखवण्यात येणारे ‘पायस’ (म्हणजे दुधात शिजवलेला भात) असलेले पात्र) असते. तिचा नववा हात आशीर्वाद देणारा आणि दहावा हात अभयदान देणारा या मुद्रांमध्ये असतात.

८ आ. दुसरे रूप : गायत्रीदेवी हंसावर आरूढ असते. ती द्विभुज असून तिच्या एका हातात ज्ञानाचे प्रतीक असणारे वेद असतात आणि दुसरा हात आशीर्वादाच्या मुद्रेत असतो.’

(संदर्भ -(संकेतस्थळावरील माहिती)

८ इ. अष्टभुजाधारी गायत्रीदेवीच्या मूर्तीविज्ञानामागील अध्यात्मशास्त्र :

८ इ १. पंचमुखी गायत्री देवी : श्री गायत्रीदेवीची पाच मुखे आहेत. ही पाच मुखे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांचे अन् प्रजापति, ब्रह्मा, विष्णु, महेश आणि मीनाक्षी या प्रमुख पाच देवतांचे प्रतीक आहेत.

८ इ २. श्री गायत्रीदेवीचे ४ उजवे हात (कर)

८ इ २ अ. सुदर्शनचक्र धारण करणे : ‘सर्वांत वरच्या उजव्या हातामध्ये कार्यरत असलेल्या तेजतत्त्वाचे प्रतीक असणारे सुदर्शनचक्र आहे. यातून ‘श्री गायत्रीदेवी असुरांशी तेजतत्त्वाच्या स्तरावर लढत आहे’, हे सुस्पष्ट होते.

८ इ २ आ. जपमाळ धारण करणे  : त्यानंतर त्याच्या खालच्या हातामध्ये जपमाळ आहे. श्री गायत्रीदेवीचा संबंध ब्रह्मदेवाशी असल्यामुळे ती ब्रह्मदेवाप्रमाणेच ज्ञानगुरु आणि दक्षिणामूर्ती शिव यांचा अखंड नामजप करत असते.

८ इ २ इ. कमळपुष्प धारण करणे : तिच्या सर्वांत खालच्या हातामध्ये पिवळे कमळ आहे. हे ज्ञानकमळ असून ते सृजनता आणि ज्ञान यांच्याशी संबंधित आहे.

८ इ २ ई. आशीर्वादाच्या मुद्रेतील कर किंवा हात : तिचा उजवा हात आशीर्वादाच्या मुद्रेत आहे. यावरून तिची तारक शक्ती कार्यरत असल्याची प्रचीती येते.

८ इ ३. श्रीगायत्रीदेवीचे ४ डावे हात (कर)

८ इ ३ अ. शंख धारण करणे : या शंखामध्ये विष्णुतत्त्व कार्यरत असून त्यामध्ये गायत्री मंत्राची नादरूपी मंत्रशक्ती कार्यरत असते.

८ इ ३ आ. पायसाचे पात्र धारण करणे : पायस (म्हणजे दुधात शिजवलेला भात) असलेले पात्र धारण करणे, म्हणजे देवी भक्तांना पायसरूपी तारक शक्तीने युक्त असणारा कृपाप्रसाद प्रदान करत असते.

८ इ ३ इ. ‘अंकुश’ धारण करणे : ‘अंकुश’ हे शस्त्र श्री गणेशाचे आहे. देवीने हे शस्त्र धारण करून अमंगल आणि अघोरी मंत्रशक्तीवर एक प्रकारे अंकुश ठेवून त्यांच्यावर नियंत्रण मिळवले आहे. यावरून श्रीगायत्री देवीमध्ये श्री गणेशाची मारक ज्ञान आणि तेज शक्ती आवश्यकतेनुसार कार्यरत होते, याचे अंकुश हे सूचक असल्याचे जाणवते.

८ इ ३ ई. वेद धारण करणे : देवी ब्रह्मस्वरूपिणी शक्ती असल्यामुळे तिच्याकडून ज्ञानशक्तीचा प्रवाह हा वेदांच्या रूपात कार्यरत होतो. वेदांतील काही मंत्र ऐकू येतात. त्यांना ‘श्रुति’ म्हणतात. काही मंत्र दृश्य स्वरूपात दिसतात. त्यांना ‘स्मृति’ म्हणतात. अशाप्रकारे वेदांची ‘श्रुति’ आणि ‘स्मृति’ अशी दोन्ही रूपे श्रीगायत्रीदेवीच्या माध्यमातून संपूर्ण ब्रह्मांडात प्रसारित होतात.’

८ इ ३. श्री गायत्रीदेवी कमलासनावर विराजमान असणे : श्री गायत्रीदेवी जेव्हा सृष्टीचे पालन करण्यासंदर्भात कार्यरत असते, तेव्हा ती गुलाबी रंगाच्या कमळावर विराजमान असते. जेव्हा ती ज्ञानाशी संबंधित कार्य करत असते, तेव्हा ती पिवळ्या रंगाच्या कमळावर विराजमान असते. तेव्हा तिच्याकडून ज्ञानतेज, भक्तीतेज, धर्मतेज, आत्मतेज, क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज अशा विविध तेजांचे प्रक्षेपण होत असते. अशा या दिव्यस्वरूपी श्री गायत्रीदेवीच्या चरणी आम्ही कोटीश: नमन करतो.

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान )(आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.५.२०२३)

९. गायत्रीदेवीचे कार्य आणि वैशिष्ट्ये

९ अ. आदिशक्तीस्वरूप : ‘गायत्रीदेवी ही सरस्वती, महालक्ष्मी आणि पार्वती या तिन्ही देवींचे एकत्रित रूप आहे. ती आदिशक्तीस्वरूप आहे.

९ आ. ब्रह्मदेवाची कार्यरत शक्ती : ती ब्रह्मदेवाची कार्यरत शक्ती असून तिच्याविना ब्रह्मदेव निष्क्रीय असतो.

९ इ. १२ आदित्य आणि सूर्य यांना तेज प्रदान करणे : सवितृपासून गायत्रीला आणि गायत्रीपासून १२ आदित्य यांना तेज प्रदान केले जाते. स्थुलातून दिसणार्‍या सूर्यालाही तेज देणारी शक्ती गायत्रीच आहे. तिच्यामध्ये सूर्याच्या सोळापट शक्ती आहे.

९ ई. देवतांची अप्रगट अवस्थेत असणारी शक्ती आणि चैतन्य प्रगट होणे : गायत्रीमंत्राच्या उच्चारणामुळे विविध देवतांची अप्रगट अवस्थेत असणारी शक्ती आणि चैतन्य प्रगट होऊन कार्यरत होते. त्यामुळे उपासकाला देवतांची कृपा शीघ्र प्राप्त होते.

१०. श्री गायत्रीदेवीची उपासना

१० अ. श्री गायत्रीदेवीच्या प्रतिमेचे पूजन करणे : गायत्रीदेवीच्या उपासनेच्या अंतर्गत तिच्या प्रतिमेचे पूजन केले जाते.

१० आ १. गायत्रीमंत्राची व्युत्पत्ति आणि अर्थ : पहिला शब्द ॐ उमटला. त्याच्यापासून मुख्य गायत्री मंत्र झाला; म्हणून गायत्री मंत्राला ‘सर्व वैदिक मंत्रांचा राजा’, अशी संज्ञा आहे. छंदामध्येसुद्धा मुख्य छंद गायत्रीच आहे. ते गायनमात्र मंत्ररूप असावे, नाहीतर तो जप होतो.’ – संदर्भ (सनातन-निर्मित ग्रंथ : मंत्रयोग)

१० आ २. गायत्रीमंत्र

‘ॐ भूर्भुवः स्वः तत् सवितुः वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ।

अर्थ : त्या सर्व रक्षक, प्राणांहून प्रिय असणार्‍या, दु:खनाशक, सुखस्वरूप, श्रेष्ठतम, तेजस्वी, पापनाश आणि देवस्वरूप परमात्म्याला आम्ही अंत:करणात धारण करतो. तो परमात्मा आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

१० आ ३. संबंधित ऋषि आणि देवता : या मंत्राचे ऋषि विश्वामित्र असून या मंत्राची देवता सवितृ आहे.

१० आ ४. गायत्री मंत्राचे महात्म्य : गायत्री मंत्र हा वेदवाङ्मयातील अमृत मंत्र आहे. या मंत्रात सवितृ देवतेची तेजोमय आराधना आहे. सवितृदेवता ही सूर्याला तेज देणारी प्रमुख देवता आहे. तिच्यापासूनच तेज आणि ज्योती यांची निर्मिती झाली. विविध देवतांचे गायत्री मंत्र प्रचलित आहेत. या मंत्रांमुळे देवतांमध्ये सुप्तावस्थेत असलेले दिव्य तेज जागृत होऊन ते प्रक्षेपित होते. एकप्रकारे गायत्री मंत्राच्या उच्चारणामुळे देवतांचे देवत्व जागृत होते आणि ते तत्त्व संबंधित देवतांच्या विविध लोकांमध्ये वास करणार्‍या समस्त भक्तांना मिळते.

१० आ ५. गायत्रीमंत्राचे उच्चारण करणे : त्रिकाल संध्या उपासनेत आणि मौंजीबंधनाच्या वेळी गायत्री मंत्राचे उच्चारण केले जाते. गायत्री मंत्र म्हटल्याने वेदोच्चारण केल्याचे फळ मिळते. ‘हा १४ शब्दांचा आणि २४ अक्षरांचा मंत्र असून त्याचा संबंध मनुष्याच्या शरिरातील २४ ठिकाणी वास करणार्‍या २४ देवतांशी आहे. हा सिद्ध मंत्र आहे.

१० आ ६. गायत्री मंत्रातील २४ अक्षरांचा संबंध विश्वातील ५ प्रकारच्या २४ घटकांशी असणे : सवितृ (सूर्य) या देवाच्या उपासनेसाठी गायत्रीमंत्र आहे. या २४ अक्षरी मंत्राचा संबंध विश्वातील ५ प्रकारच्या २४ घटकांशी किंवा २४ तत्त्वांशी आहे.

३ अ. अग्नेयादी २४ देवता  : अग्नी, वायु, सूर्य, यम, बृहस्पती, इंद्र, गंधर्व, पूषा, मित्रावरुण, त्वष्टा, मरुत्, वसु, सोम, विश्वेदेव, अश्विनीकुमार, प्रजापति, रुद्र, ब्रह्मा, विष्णु, व्योम, चंद्र, कुबेर, धन्वंतरी आणि विश्वकर्मा.

३ आ. वसिष्ठादी २४ ऋषि : कश्यप, गौतम, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, वसिष्ठ , जमदग्नी, भृगु, मरीचि, अत्रि, पुलस्त्य, पुलह, क्रतु, अंगिरा, वैशंपायन, शांडिल्य, याज्ञवलक्य, गर्ग, दधिची, मार्कण्डेय, व्यास, अगस्ती, वाल्मिकी आणि दुर्वास असे २४ ऋषि धर्मव्यवस्था पहाणारे असल्याने त्यांनी ‘सप्तर्षी’ हे परमपद प्राप्त केले आहे. विविध युगात अवतारी कार्याला अनुरूप असणार्‍या सप्तर्षींच्या गटातील ऋषि आवश्यकतेनुसार पालटत असतात.

३  इ. प्रल्हादादी २४ शक्ती : प्रल्हाद, आल्हादिनी, सौदामिनी, धारिणी, तारिणी, योगिनी, ब्रह्माणी किंवा ब्राह्मी, नारायणी, रुद्राणी, शिवानी, इंद्राणी, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, योगशक्ती, विघटन शक्ती, तारक शक्ती, मारक शक्ती, धर्मशक्ती, सृजनशक्ती, वैष्णवी, अंतरंगा, बहिरंगा आणि निर्गुण शक्ती.

३  ई. पृथ्वीव्यादी २४ मूलतत्त्वे : पंचमहाभूते (पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश), पंचप्रमाण, पंचसूक्ष्म ज्ञानेंद्रिये, पंचसूक्ष्म कर्मेंद्रिये, अहंतत्त्व, प्रकृती आणि ब्रह्म.

३  उ.  चंपकादी म्हणजे चंपा या फुलासह २४ पुष्पे : मोगरा, गुलाब, झेंडू, भुईकमळ, ब्रह्मकमळ, कृष्णकमळ, स्वस्तिक, म्हणजे तगरीचे फूल, चंपा, कण्हेर, रातराणी, जाई, जुई, सोनचाफा, बकुळी, रजनीगंधा, रातराणी, सूर्यफूल, अनंत, केवडा किंवा केतकी, गोकर्ण, अबोली, शेवंती, जास्वंदी अाणि सदाफुली.

१० आ ७. त्रिपाद गायत्री : यांत ‘ॐ’ पुढीलप्रमाणे तीन वेळा येतो. त्यामुळे या मंत्राला ‘त्रिपाद गायत्री’, असे संबोधले जाते.

ॐ भूर्भुव: स्व: ।
ॐ तत् सवितु: वरेण्यं  भर्गाे देवस्य धीमहि ।
ॐ धियो यो न : प्रचोदयात् ।

त्रिपाद गायत्रीत श्वास घेतांना पहिले पद, ते रोखून ठेवल्यावर दुसरे पद आणि श्वास सोडतांना तिसरे पद मनात म्हटले की, ‘पूरक, कुंभक आणि रेचक’ यांचे प्रमाण १:४:२ असलेला प्राणायामही होतो.

१० आ ७ अ. त्रिपाद गायत्रीचे आध्यात्मिक महत्त्व : ‘त्रिपाद गायत्री’ हे वेदांचे मुख असून परम पुण्यदायी आहे. दिवसाच्या तीन वेळांमध्ये उच्चारलेल्या गायत्रीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत.

१० आ ९. गायत्रीयाग किंवा गायत्रीष्टी : ‘सवितृ’ आणि ‘गायत्री’ या देवींना प्रसन्न करण्यासाठी अनुक्रमे ‘सवितृकाठ्ययाग’ (टीप) आणि ‘गायत्रीयाग’ केले जातात. ‘इष्टी’ म्हणजे ‘याग’. श्रीगायत्रीदेवीसाठी केलेल्या यागाला वेदांमध्ये ‘गायत्रीष्टी’, असे संबोधले आहे. या यागामध्ये ‘संवर्ग’ नावाच्या श्रीअग्नीदेवाच्या रूपाला प्रसन्न करण्यासाठी याग करतात. अन्न मिळवण्यासाठी अथवा राष्ट्रात परस्पर स्पर्धा उत्पन्न झाल्यावर ही इष्टी किंवा याग करावा. (- संदर्भ : मैत्रायणी संहिता, तैतेरी संहिता)

टीप : सवितृ देवतेला प्रसन्न करण्यासाठी सवितृकाठ्ययाग केला जातो. ‘सहस्रो वर्षांपूर्वी अत्री ऋषींनी हा याग पिठापूर, आंध्रप्रदेश येथे केला होता’, असा उल्लेख श्रीपादश्रीवल्लभ यांच्या चरित्रात आहे. या यागाचा उल्लेख धर्मशास्त्रात आहे.

११. गायत्री उपासनेमुळे प्राणशक्ती आणि आनंद यांची वृद्धी होणे : ‘गायत्री ही प्राणविद्या आहे. प्राणशक्तीचे संतुलन, उत्कर्ष आणि संवर्धन करणे, हे गायत्री साधनेचे अभिनव अंग आहे. प्राणशक्तीच्या अस्तित्वानेच आनंदाची अनुभूती घेणे शक्य होते आणि प्राणशक्तीच्या प्रखरतेमुळेच आनंदाची अनुभूती तीव्रेतेने येऊ शकते. प्राणाचे रक्षण करते ती ‘गायत्री.’

अनुभूती : ८.१०.२०१३ मध्ये मला पहाटे ५ वाजता जाग आली. तेव्हा मला सूक्ष्मातून ‘गायत्रीमंत्र’ ऐकू येत होता. तो मंत्र ऐकत असतांना माझे मन एकाग्र चित्त झाले आणि मला खोलीतील उत्तर दिशेच्या भिंतीमध्ये श्री गायत्रीदेवीचे मंगलमय दर्शन झाले. त्यानंतर श्री गायत्रीदेवीच्याच कृपेने माझ्याकडून तिचे सात्त्विक भाव असलेले चित्र रेखाटले गेले. यासाठी मी श्री गायत्रीदेवीच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– संकलन : कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.५.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.