भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या, तर भारत हिंदु राष्ट्र घोषित झाले असते ! – टी. राजासिंह, प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा आमदार, भाजप

पडघा (भिवंडी) येथील सभा !

सभेत बोलतांना प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि आमदार टी. राजासिंह

ठाणे – हिंदू एकत्र आले, तर हिंदु राष्ट्र होईल; पण आता तसे होईल, असे वाटत नाही. या वेळी निवडणुकीत जर भाजपने ४०० पेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या, तर भारत हिंदु राष्ट्र घोषित झाले असते. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करत राहीन, असे उद्गार तेलंगाणा (भाग्यनगर) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी भिवंडी येथील पडघा भागात आयोजित केलेल्या सभेत काढले. १५ जून या दिवशी येथे ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने संत संमेलन आणि हिंदु धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. धर्मसभेच्या व्यासपिठावर बालयोगी सदानंद महाराज, महंत शिर चिदानंद सरस्वती महाराज, महंत श्री फुलनाथ बाबा, श्री शिवरूपानंद स्वामी आणि अन्य संत यांची उपस्थिती लाभली. ‘देशातील प्रत्येक हिंदूने धर्माचरण करून राष्ट्रसेवेसाठी योगदान देण्यासह हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प करावा’, असेही टी. राजासिंह म्हणाले.

आमदार टी. राजासिंह यांच्या भाषणातील महत्त्वाची सूत्रे

लव्ह जिहाद रोखण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन आवश्यक !

‘हिंदु तरुणी आणि महिला यांच्यावर अत्याचार करून त्यांना वाममार्गाला लावण्याचे षड्यंंत्र देशात राबवले जात आहे. याच्या विरोधात समाजाने जात, पंथ, पक्ष, प्रांतवाद यांमध्ये न अडकता हिंदु म्हणून भगव्या ध्वजाखाली संघटित झाले पाहिजे. असे न केल्यास ‘लव्ह जिहाद’ला अनेक तरुणी बळी पडतील. ‘लव्ह जिहाद’ला थांबवण्यासाठी हिंदु तरुणींना जागृत करणे आणि हिंदूंचे प्रभावी संघटन निर्माण करणे हाच पर्याय आहे. ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्यासाठीही सरकारचा पाठपुरावा घ्यावा.

काँग्रेसने वर्ष १९४८ पासूनच बहुसंख्य हिंदु धर्मीय असणार्‍या भारताचे इस्लामीकरण करण्याचा डाव आखला होता. केवळ महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून ‘लव्ह जिहाद’ची सहस्रो प्रकरणे घडवली गेली. देशभर हे लोण पसरत आहे. ‘हिंदूंना वेगळे कायदे आणि मुसलमानांना त्यांच्या धर्मानुसार मोकळीक’ हे तत्त्व मोडून काढल्यास आतंकवाद, ‘लव्ह जिहाद’ यांना आळा बसेल.

भ्रमणभाषमधील विजेरी दाखवून अनुमोदन देतांना धर्माभिमानी हिंदू

पंतप्रधानांनी वक्फ कायदा रहित करावा !

लोकसंख्या जिहाद, लव्ह जिहाद आणि वक्फ कायद्यांच्या आधाराने लँड जिहाद करून भारताची भूमी बळकावून ‘गजवा-ए-हिंद’ (भारताचे इस्लामीकरण) या युद्धाद्वारे भारताचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र मोठ्या प्रमाणावर चालू आहे. वक्फ कायद्यावर आधारित वक्फ बोर्डाच्या माध्यमातून भारतामध्ये १० लाख एकरहून अधिक भूमी, तसेच महाराष्ट्रात १ लाख २६ सहस्र एकर भूमी मुसलमानांनी बळकावली आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी वक्फ बोर्ड कायदा संपवून टाकावा. वक्फ बोर्डाच्या भूमीवर हिंदूंसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये, घरे बनवावीत.

… तर हिंदू मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करतील !

आज महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर मोठ्या प्रमाणात धर्मांधांकडून अतिक्रमण होत आहे. श्री मलंगगड याचे उदाहरण आहे. श्री मलंगगडाला मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आहे; पण तो दर्गा असल्याचे सांगून हिंदूंची थट्टा केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी श्री मलंगगड धर्मांधांच्या अतिक्रमणातून मुक्त करावा. हा सकल हिंदु समाज तुमचे हात बळकट करील.

हिंदूंनी शंभू राजांचा आदर्श समोर ठेवावा !

धर्माच्या रक्षणासाठी प्राण त्यागलेले छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ही भूमी आहे, हे लक्षात ठेवून आपल्यातील हिंदुत्व जागृत केले पाहिजे. ‘जगू तर शंभू राजांप्रमाणे आणि मरू तरी शंभू राजांप्रमाणे’ इतकी प्रखरता प्रत्येक हिंंदूने स्वतःमध्ये आणायला हवी.

धर्मसभेत पारित करण्यात आलेले ठराव !

१. धर्मांतर बंदी कायदा पारित करण्यात यावा

२. वक्फ बोर्ड कायदा रहित करण्यात यावा

३. लव्ह जिहादविरोधी कायदा संमत करावा

४. गोहत्या बंदी कठोर करून त्याची कार्यवाही व्हावी

५. अवैध भूमीवरील अतिक्रमण हटवण्यात यावे