‘एस्.टी.’चा प्रवास !

राज्य परिवहन महामंडळ सेवेत असणारी एस्.टी.

महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या बसने नुकतीच ७५ वर्षे पूर्ण करून ७६ व्‍या वर्षात पदार्पण केले आहे. ३६ गाड्यांसह चालू झालेल्‍या या प्रवासात आजमितीला १८ सहस्रांहून अधिक गाड्या महामंडळात सेवा देत आहेत. एस्.टी. हा ग्रामीण भागातील नागरिकांचा नेहमीच जिवाभावाचा विषय ठरला आहे. तालुक्‍यात शिक्षणासाठी प्रतिदिन जाणारे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी असोत वा आठवडी बाजारात खरेदीसाठी जाणारी ग्रामस्‍थ मंडळी असोत, माहेरी पाहुणचार घेण्‍यासाठी आलेली नवविवाहिता असो वा नोकरी-व्‍यवसायानिमित्त दैनंदिन प्रवास करणारी मंडळी असोत, सर्वांनाच इच्‍छित स्‍थळी नेण्‍याचे आणि आणण्‍याचे काम आजवर राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या या लाल परीने केले आहे. एस्.टी.चे चालक-वाहक आणि नियमित प्रवासी यांच्‍यात एक अतूट नाते असते. नेहमीची व्‍यक्‍ती स्‍थानकावर दिसली नाही की, एस्.टी.च्‍या वाहकालाही चुकल्‍या चुकल्‍यासारखे वाटते. एस्.टी.च्‍या चालकांनाही नेहमीच्‍या रस्‍त्‍यातील खड्डे, गतीरोधक, वळणे अगदी तोंडपाठ झालेली असतात. त्‍यामुळे एखाद्या ठिकाणी अधिक प्रवासी चढले वा उतरले, तरी नेहमीच्‍या थांब्‍यांवर एस्.टी.ची यायची वेळ सहसा चुकत नाही. आज कोकण रेल्‍वे भरभरून वहात आहे, हा सारा भार पूर्वी एस्.टी. तिच्‍या अंगाखांद्यांवर वहात होती. आजमितीलाही अनेक गावांत एस्.टी.चा आधार आहे. आजही सुट्टीत गावाला जायचे म्‍हटले, तर रेल्‍वेनंतर पुढचा प्रवास अनेकांना एस्.टी.नेच करावा लागतो. वाढत्‍या महागाईसमवेत गारेगार प्रवासाचा अनुभव देणार्‍या वातानुकूलित आणि नंतर इलेक्‍ट्रिक गाड्या आल्‍या. महाराष्‍ट्रात महिलांना तिकीट दरांत ५० टक्‍के सवलत दिल्‍याने महिला प्रवाशांची संख्‍या कमालीची वाढली. पुरुषांच्‍या खांद्याला खांदा लावून आता महिला वाहकही गाड्यांतून जागोजागी दिसू लागल्‍या आहेत.

आजही रस्‍त्‍यांचे जाळे पसरले, तरी त्‍यांचे खड्डे काही गेले नाहीत. अनेक ठिकाणी मातीच्‍या कच्च्या रस्‍त्‍यांतून एस्.टी.ला प्रवास करावा लागतो. अनेक भागांत मोठ्या प्रमाणात प्रवासी उपलब्‍ध असतांना त्‍या भागांत एस्.टी.च्‍या केवळ २ – ३ फेर्‍या होतात. या काळात स्‍थानिक जीपवाले प्रवासी कोंबून बक्‍कळ पैसे कमावतात. राज्‍यातील जवळपास सर्वच एस्.टी. आगारांच्‍या बाहेर वेगवेगळ्‍या मार्गांनी प्रवाशांना घेऊन जाणार्‍या काळ्‍या पिवळ्‍या चारचाकी गाड्यांचा समूह प्रवाशांना हातवारे करत बोलावत असतो. परिवहन मंडळाकडे असलेला बसगाड्यांचा ताफा राज्‍याच्‍या वाढत चाललेल्‍या लोकसंख्‍येच्‍या तुलनेत पुष्‍कळ अल्‍प आहे. त्‍याचा लाभ खासगी आस्‍थापने घेऊन प्रवाशांना लुटतात. छप्‍पर उडालेल्‍या एस्.टी.चा व्‍हिडिओ जुलै २०२३ मध्‍ये प्रसारित झाला होता. अनेक गाड्यांची आणि आगारांची स्‍थिती दयनीय असते. काही कर्मचारी उद्धटही असतात. एस्.टी.च्‍या सेवाभावी उपक्रमातील या त्रुटी दूर करून ग्राहकांचा प्रवास सुलभ होण्‍यासाठी प्रवासी प्रतीक्षेत आहेत !

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.