पाकमध्ये ७२ वर्षीय वृद्धाचा १२ वर्षांच्या मुलीशी विवाह लावून देण्याचा प्रयत्न !

  • वृद्ध वराला अटक, तर मुलीचा पिता फरार !

  • वडिलांनी मुलीला ५ लाख रुपयांना विकले !

पेशावर (पाकिस्तान) – खैबर पख्तुनख्वा प्रांतात आलम सय्यद नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या १२ वर्षीय मुलीला एका ७२ वर्षीय वृद्धाला ५ लाख रुपयांना विकले. वडिलांनी स्वतःच्या मुलीचा त्या वृद्धाशी विवाह लावून देण्याचा प्रयत्नही केला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी  विवाह रोखून वृद्धाला अटक केली. मुलीचा पिता घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांनी मुलीची सुटका केली आहे. पोलिसांनी आरोपी वृद्ध व्यक्ती आणि आलम सय्यद यांच्याविरुद्ध बालविवाह कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.

पाकिस्तानमध्ये बालविवाहाचे सर्वांत मोठे कारण दारिद्य्र असल्याचे मानले जाते. आदिवासी भागातील लोक ५ लाख ते २० लाख रुपये देऊन अल्पवयीन मुलींशी लग्न करतात. यात धार्मिक नेते, आदिवासी प्रमुख आणि राज्य प्रशासन सर्वांचा सहभाग आहे.

बालविवाहाची गेल्या काही वर्षांत समोर आलेली काही प्रकरणे !

१. स्वात शहर (खैबर पख्तुनख्वा प्रांत) : येथे ६ मे २०२४ या दिवशी एका व्यक्तीने त्याच्या १३ वर्षीय मुलीचे लग्न एका ७० वर्षीय व्यक्तीशी लावून दिले. पोलिसांनी वडील आणि वर यांना अटक केली.

२. थट्टा शहर (सिंध प्रांत) : येथे एका अल्पवयीन मुलीचे ५० वर्षीय घरमालकाशी बलपूर्वक लग्न लावून देण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी मुलीची सुटका केली.

३. राजनपूर शहर (पंजाब प्रांत) : एका ११ वर्षीय मुलीचा विवाह ४० वर्षीय व्यक्तीशी झाला.

४. वर्ष २०२१ मध्ये इम्रान खान यांच्या सत्ताकाळात ६४ वर्षीय आमदार मौलाना सलाउद्दीन अयुबी यांनी १४ वर्षांच्या मुलीशी विवाह केला होता.

संपादकीय भूमिका 

पाकिस्तानात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतात. यामागे दारिद्य्र असल्याचे बोलले जाते; परंतु दारिद्य्र भारतातही आहेच, तरी अशा घटना येथे घडत असल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे अशा घटनांमागे पाकिस्तान्यांची धार्मिक विचारसरणीच कारणीभूत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये !