PM Modi & Giorgia Maloney : पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या समकक्ष जॉर्जिया मेलोनी यांच्यात द्विपक्षीय चर्चा !

केंद्रशासन इटलीत ‘यशवंत घाडगे स्मारक’ विकसित करणार !

रोम (इटली) – येथील इटालिया येथे झालेल्या जी-७ शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या समकक्ष जॉर्जिया मेलोनी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेत भारत आणि इटली यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला. यासह संरक्षण क्षेत्र आणि त्यातील सहकार्य यांवरही दोघांमध्ये चर्चा झाली, तसेच औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात म्हटले आहे की,

१. पंतप्रधान मोदी यांनी दुसर्‍या महायुद्धात इटलीच्या मोहिमेतील भारतीय सैन्याचे योगदान मान्य केल्यावरून इटली सरकारचे आभार मानले. इटलीतील मॉन्टोन येथे यशवंत घाडगे या दुसर्‍या महायुद्धातील वीरगती प्राप्त झालेले भारतीय सैनिकाचे स्मारक विकसित करणार असल्याचे घोषित केले. यात इटली सरकारही सहकार्य करेल.

२. स्वच्छ ऊर्जा, उत्पादन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, दूरसंचार, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि खनिज,े या क्षेत्रांतील संबंध वाढवण्याचे दोन्ही नेत्यांनी आवाहन केले.

कोण होते यशवंत घाडगे ?

मॉन्टोन येथे २ वर्षांपूर्वी इटली सरकारने दुसर्‍या महायुद्धातील सैनिकांच्या स्मरणार्थ एक स्मारक उभारले. यामध्ये यशवंत घाडगे या ब्रिटीश सैन्यात लढणार्‍या सैनिकाचेही स्मारक आहे. घाडगे हे मूळचे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचे रहिवासी होते. ते इंग्रज राज्य करत असलेल्या भारतातील सैन्यात सेवारत होते. दुसर्‍या महायुद्धात ब्रिटनने भारतीय सैनिकांनाही या युद्धात उतरवले होते. इटलीतील टायबर नदीच्या किनार्‍यावर ब्रिटन सैन्याच्या एका तुकडीत यशवंत घाडगे हेसुद्धा सहभागी होते. या युद्धात त्यांना वीरमरण आले; परंतु या वेळी त्यांनी एकट्याने जर्मन सैनिकांची संपूर्ण छावणी उद्ध्वस्त केली, तसेच त्यांच्या अनेक सैनिकांना ठार मारलेे. या पराक्रमाविषयी त्यांना मरणोत्तर ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ या ब्रिटीश सैन्यातील सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले होते.