वक्फ मंडळाला बळकटी देणार, मग हिंदूंची वळकटी (पिळवणूक) करणार का ? – मनसे

प्रकाश महाजन

मुंबई – लोकसभा निवडणुकीत चांगली मते मिळाली नाहीत; म्हणून राज्य सरकार अल्पसंख्यकांचे लांगूलचालन करत आहे. ही चांगली गोष्ट नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मते वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आला, तर मग हे सरकार हिंदूंची वळकटी (पिळवणूक) करणार आहे का ?, असा प्रश्‍न मनसेचे अध्यक्ष प्रकाश महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला. वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी सरकारने १० कोटी रुपये घोषित केले. या निर्णयाचा प्रकाश महाजन यांनी निषेध केला.

वक्फ मंडळाने एखाद्या भूमीवर दावा सांगितला, तर त्या भूमीच्या मालकाला न्यायालयात दाद मागता येत नाही. वक्फ प्राधिकरणाकडे जावे लागते. लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने नरेंद्र मोदी यांना पुरेसे पाठबळ दिले असते, तर वक्फ मंडळच रहित झाले असते. लोकसभा निवडणुकीत मुसलमानांनी महायुतीला अल्प मतदान केले; म्हणून वक्फ मंडळाला १० कोटी रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला असेल. यामुळे येत्या निवडणुकीत त्यांची काही मतेही मिळतील; पण हिंदूंचे काय ? हिंदूंचे संरक्षण तुम्ही कसे करणार आहात ?, असे प्रश्‍नही या वेळी प्रकाश महाजन यांनी उपस्थित केले.