सांगली येथे इमारतींच्या वाहनतळ क्षेत्रावरही आकारला जाणार कर !

सांगली – महापालिका क्षेत्रातील सर्व इमारतींमधील वाहनतळ (पार्किंग) क्षेत्राला रिकाम्या प्लॉटच्या शुल्काप्रमाणे मालमत्ताकर आकारणी होणार आहे. १० जून या दिवशी झालेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्रशासकीय महासभेत याविषयीचा ठराव करण्यात आला. यापुढे अनधिकृत पाणीजोडणी आढळल्यास वापराच्या प्रकारानुसार ७ सहस्र ५०० ते १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा ठरावही मान्य करण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, चंद्रकांत खोसे, उपायुक्त वैभव साबळे, शिल्पा दरेकर, संजीव ओहोळ आदी अधिकारी उपस्थित होते.

आतापर्यत महापालिका क्षेत्रात घर, इमारती (अपार्टमेंट) आणि अन्य व्यापारी संकुलांच्या इमारतींच्या वाहनतळ क्षेत्राला मालमत्ताकर नव्हता. इमारतींचे मालक ग्राहकांकडूनच देखभाल-दुरुस्तीसाठी लाखोे रुपये वसूल करायचे; मात्र सदर जागेवर महापालिकेचा कोणताच कर नव्हता. आता यापुढे वाहनतळ क्षेत्राला मालमत्ताकर लागू होणार आहे. महापालिका क्षेत्रात मध्यंतरी अनधिकृत पाणीजोडणी आढळली. त्याचीही गंभीर नोंद या बैठकीत घेण्यात आली आहे. अनधिकृत घरगुती वापराच्या पाणी जोडणीसाठी दंडाची रक्कम ३ सहस्र रुपयांवरून ७ सहस्र ५०० रुपये, व्यावसायिक वापराच्या जोडणीसाठी ५ सहस्र रुपयांवरून २० सहस्र रुपये, तर औद्योगिक वापराच्या जोडणीसाठी दंडाची रक्कम १ लाख रुपये केली आहे. तसा ठराव मान्य करण्यात आला.