पुणे – भारत सरकारचे संस्कृती मंत्रालय, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र यांच्या सहयोगाने ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था’ यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्राचीन हस्तलिखिते, ग्रंथसंपदा आणि दुर्मिळ वस्तूंचे संवर्धन करण्यासंबंधीचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालू करत आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप आपटे आणि संवर्धन विभागप्रमुख वर्षा कोटफोडे यांनी १४ जून या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. भूपाल पटवर्धन, मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, विश्वस्त श्री. श्रीनिवास कुलकर्णी उपस्थित होते.
याविषयी अधिक माहिती देतांना आपटे पुढे म्हणाले की, ऑगस्ट २०२४ पासून चालू होणारा एक वर्ष कालावधी असलेला हा पूर्णवेळ अभ्यासक्रम असून तो इंग्रजी माध्यमातून शिकवला जाणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधारक यासाठी प्रवेश घेऊ शकतो, वयाचे कोणतेही बंधन नाही. भारतीय वैज्ञानिक वारसा आणि परंपरा, संस्कृती, तत्त्वज्ञान या विषयांस भारतीय ज्ञान प्रणालीमधील असलेले स्थान लक्षात घेवून या अभ्यासक्रमाची आखणी केलेली आहे. ज्यात या विषयांबरोबरच दुर्मिळ आणि प्राचीन वस्तूंचे संवर्धन करण्याची शास्त्रशुद्ध पद्धती यामध्ये शिकवली जाणार आहे.
या वेळी बोलतांना पटवर्धन म्हणाले की, भांडारकर संस्थेतील दुर्मिळ अशा सुमारे १७ सहस्र हस्तलिखितांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन आणि संवर्धन करण्यात आले आहे. संवर्धन विभाग त्यासाठीच संस्थेने चालू केला आहे. त्यादृष्टीने हा पदविका अभ्यासक्रम प्रथमच चालू करत आहोत. याचा जरुर लाभ विशेषतः तरुण विद्यार्थ्यांनी अधिक घ्यावा, असे आवाहन आहे.