इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) महापालिकेत एकाच वेळी दोन आयुक्तांचा पदभार ! 

इचलकरंजी महापालिकेत एकाच वेळी उपस्थित असणारे आयुक्त ओमप्रकाश दिवटे (डावीकडे) आणि आयुक्त पल्लवी पाटील (उजवीकडे)

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – इचलकरंजी महापालिकेतील आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचे स्थानांतर करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी पल्लवी पाटील यांनी पदभार स्वीकारला होता. यानंतर ओमप्रकाश दिवटे यांनी याला महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकारण (मॅट) मधून स्थगिती आणून १४ जून या दिवशी तेही इचलकरंजी येथील महापालिकेत कार्यभार स्वीकारण्यासाठी उपस्थित झाले. यामुळे आयुक्त कार्यालयात एकाच वेळी दोन आयुक्त उपस्थित होते. आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी कागदपत्रे दाखवल्यावर पल्लवी पाटील यांनी त्यांना लेखी सूचना नसल्याने कार्यभार सोडण्यास प्रारंभी नकार दिला. अखेर सरकारी अधिवक्त्यांशी झालेले बोलणे आणि निकालाची कागदपत्रे पाहून पल्लवी पाटील यांनी त्यांचा पदभार सोडला.

१.  इचलकरंजी येथे आयुक्त पदाची सूत्रे घेऊन केवळ ९ महिने झालेले असतांना राज्याच्या नगरविकास विभागाने १२ जून या दिवशी कोणतेही सबळ कारण नसतांना इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या स्थानांतराचे आदेश दिले. त्यांच्या जागी सातारा जिल्हा प्रकल्प अधिकारी पल्लवी पाटील यांनी शासनाच्या आदेशानुसार इचलकरंजी महापालिकेत येऊन पदभारही स्वीकारला होता.

२. दुसरीकडे ओमप्रकाश दिवटे यांनी पदभार न सोडता नगरविकास विभागाच्या निर्णयाच्या विरोधात प्राधिकरणाकडे दावा प्रविष्ट केला. प्राधिकरणाने दिवटे यांची बाजू मान्य करत १३ जून या दिवशी दिवटे यांच्या स्थानांतरास स्थगिती दिली. त्यामुळे आयुक्त दिवटे हे १४ जून या दिवशी इचलकरंजी येथील कार्यालयात उपस्थित झाले.

३. पल्लवी पाटील याही त्यांचा कार्यभार सोडण्यास सिद्ध नसल्याने दिवटे यांनी पल्लवी पाटील यांच्या शेजारी आसंदी ठेवून तेथूनच कार्यभार चालू केला. दोघांचाही वरिष्ठ पातळीवर संपर्क चालू होता. अखेर दिवटे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेतली. यानंतर प्राधिकरणाचा आदेश पाहून पल्लवी पाटील यांनी पदभार सोडला.

४. झालेला हा सगळा प्रकार प्रशासनातील अधिकारी आणि प्रसारमाध्यमांच्या समोरच झाल्याने प्रशासनातील समन्वयातील अभावामुळे उडालेला गोंधळ सर्वांना समोर पहायला मिळाला.