मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट वाढल्याने त्यांना पकडण्यासाठी लावले पिंजरे !

मंत्रालयातील एका मजल्यावर उंदरांना पकडण्यासाठी लावलेला पिंजरा

मुंबई, १४ जून (वार्ता.) – महाराष्ट्राच्या मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. मंत्रालयातील उपाहारगृहातील आणि कर्मचारी आणत असलेले खाद्यपदार्थ यांचे खरकटे खाण्यासाठी आलेले उंदीर विविध मजल्यांवरील विभागांमध्ये शिरून कागदपत्रे कुरतडत असल्यामुळे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी ही समस्या डोकेदुखी बनली आहे. मंत्रालयात शिरलेल्या उंदरांना पकडण्यासाठी काही मजल्यावर तारेचे पिंजरे ठेवण्यात आले आहेत. नियमितच्या कामकाजासह उंदीर पकडण्याचे अतिरिक्त काम करण्याची वेळ कर्मचार्‍यांवर आली आहे.

१. मंत्रालयात कर्मचारी, अधिकारी आणि मंत्री यांना भोजन अन् अल्पाहार करण्यासाठी स्वतंत्र उपाहारगृहे आहेत; मात्र भोजनाच्या वेळेत त्यामध्ये सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना एकाच वेळी जाता येत नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी आणि अधिकारी विभागातच भोजन करतात.

२. मोठ्या संख्येने असलेले कर्मचारी विभागातच सहकार्‍यांचा वाढदिवस साजरा करतात. त्या वेळी विभागांमध्ये खाद्यपदार्थ आणले जातात. अनेकदा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपाहारगृहांतून किंवा बाहेरून खाद्यपदार्थ विभागात मागवले जातात.

३. त्या वेळी विभागात पडलेले पदार्थ किंवा पदार्थांच्या वेष्टने कचर्‍याच्या डब्यात टाकल्यावर त्यांना चिकटलेले पदार्थ आदी खाण्यासाठी उंदीर विभागांमध्ये शिरत असण्याची शक्यता आहे.

४. मंत्रालयातील सर्वच विभागांतील पटलांवर मोठ्या प्रमाणात धारिकांचा खच असल्याने खाद्यपदार्थ खाण्यासह ही कागदपत्रेही उंदीर कुरतडत आहेत. त्यामुळे उंदरांना पकडण्यासाठी विविध विभागांमध्ये वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

५. ‘उंदरांनी महत्त्वाच्या धारिका कुरतडल्यामुळे होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता उंदीर विभागांमध्ये शिरू नयेत, यासाठी केवळ काही विभागांपुरती नव्हे, तर संपूर्ण मंत्रालयाच्या दृष्टीने प्रशासनाला येत्या काळात उपाययोजना काढावी लागणार आहे’, असे म्हटले जात आहे.

संपादकीय भूमिका 

महाराष्ट्राच्या मंत्रालयासारख्या अतीमहत्त्वाच्या ठिकाणी अशी स्थिती असणे दुर्दैवी !