शारीरिक त्रास होत असतांना सतत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात रहाणार्‍या मुकींदपूर, अहिल्यानगर येथील श्रीमती पद्मावती देशमुख (वय ९३ वर्षे) !

श्रीमती पद्मावती देशमुख

‘श्रीमती पद्मावती देशमुख वय आणि आजारपण यांमुळे पूर्ण झोपून आहेत. त्यांच्याविषयी त्यांची मुलगी सौ. रेखा देशमुख, नातू श्री. शशांक देशमुख, नात सौ. कविता देशमुख आणि नातीची मैत्रीण होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. सौ. रेखा देशमुख (श्रीमती पद्मावती देशमुख यांची मुलगी, वय ६७ वर्षे)

१ अ. साधनेची ओढ : ‘आईने पूर्वी प.पू. पाचलेगांवकर महाराज (खामगाव, जि. बुलढाणा) यांचा अनुग्रह घेतला होता. आई मूर्तिजापूरहून (जि. अकोला) नेवासा (जि. अहिल्यानगर) येथे माझ्याकडे रहायला आल्यावर तिला सनातन संस्था सांगत असलेली साधना समजली. तेव्हापासून ती सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करते. २ – ३ वर्षे तिने देवद येथील सनातनच्या आश्रमात राहून सेवाही केली आहे.

१ आ. नित्यसाधना करत असल्यामुळे मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन करता येणे : आई नित्यनेमाने उपासना करत असल्याने तिच्या एका मुलाचे (माझ्या मोठ्या भावाचे) तरुणपणी निधन होऊनही ती ते दु:ख सहन करू शकली. ६ वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचे (कै. त्र्यंबकराव देशमुख) निधन झाले. तेव्हाही स्थिर राहून तिने ‘गुरूंची इच्छा’, असे म्हणून ते स्वीकारले.

१ इ. संतांप्रती भाव : मागच्या वर्षी सनातनच्या ११९ व्या (समष्टी) संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार आमच्या घराजवळ रहाणार्‍या एका साधकांकडे येणार होत्या. हे समजल्यावर ‘त्या आपल्या घरी याव्यात’, असे तिला सारखे वाटत होते. तेव्हा ती झोपून नव्हती; पण तिच्या अंगात शक्तीही नव्हती, तरी तिने त्यांच्यासाठी खाण्या-पिण्याची सर्व सिद्धता स्वतः केली होती.

१ ई. नीटनेटकेपणा : आता आई पूर्ण झोपून आहे. तिला शारीरिक त्रास होत असूनही ती प्रतिदिन तिच्या डोक्याला तेल लावायला सांगून केस विंचरून घेते.

१ ई. प्रेमभाव : घरी कुणी आल्यास ‘त्यांचे खाणे-पिणे व्यवस्थित केले का ?’,  याकडे तिचे लक्ष असते.

१ उ. कृतज्ञताभाव : तिच्या मनात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञताभाव आहे. मागील २ मासांत तिचे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी सूक्ष्मातून बोलणे आणि आत्मनिवेदन करणे’, यांचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. ती सतत म्हणते, ‘‘गुरुदेवांच्या कृपेने मी सगळे सहन करू शकते आणि इतके त्रास होत असूनही मला झोप लागते.’’

१ ऊ. आईला अनेकदा भिंतीवर ‘गाय’, ‘श्रीकृष्ण’, ‘मोक्षद्वार’, कधी ‘गजानन महाराज’ किंवा ‘गणपति’ स्पष्ट दिसतात.

२. श्री. शशांक देशमुख, संभाजीनगर (नातू, श्रीमती पद्मावती देशमुख यांच्या मुलीचा मुलगा)

२ अ. परिस्थिती स्वीकारणे

१. ‘पूर्वी आजीच्या घरची परिस्थिती पुष्कळ चांगली होती; पण तिच्या लग्नानंतर अनेक बरे-वाईट प्रसंग घडून तिच्या जीवनात अनेक चढ-उतार आले; पण आजी त्या प्रसंगांत अडकली नाही.

२. गेल्या ३५ – ४० वर्षांपासून आजी आमच्याकडे (तिची मुलगी सौ. रेखा देशमुख यांच्याकडे) रहात आहे. आजीने ही परिस्थितीही स्वीकारली आहे.

३. ‘आजीला आजोबांच्या समवेत संसार करावा’, असे वाटायचे; मात्र आजोबांना ‘साधनेसाठी प.पू. पाचलेगांवकर महाराज यांच्या मठात रहावे’, असे वाटत होते. त्यामुळे त्यांचे एकत्र रहाणे फारसे झाले नाही. तेही तिने स्वीकारले.

२ आ. आजीचे बोलणे मनाला न लागणे : मी सेवेसाठी छत्रपती संभाजीनगर येथे रहातो. मी अधूनमधून आजीला भेटायला आणि आवश्यक साहित्य द्यायला घरी जातो, तेव्हा आजी तिला होत असलेल्या त्रासामुळे मला ओरडते; पण तिच्या बोलण्याचा मला त्रास होत नाही. ‘आजीची आध्यात्मिक उन्नती झाली असावी’; म्हणून ‘मला तिच्या अशा वागण्याचा त्रास होत नसावा’, असे मला वाटते.’

३. सौ. कविता देशमुख (नात, श्रीमती पद्मावती देशमुख यांच्या मुलीची मुलगी)

३ अ. नामजपामुळे आसक्ती उणावणे : मध्यंतरी तिची खाणे-पिणे यांविषयीची आसक्ती वाढली होती; पण नामजप आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन यांमुळे तिची आसक्ती उणावून गुरुदेवांशी अनुसंधान वाढले.

३ आ. आजी रुग्णाईत असतांना जाणवलेली सूत्रे

१. ‘यापूर्वी आजीचा २ वेळा अस्थीभंग झाला आहे. मध्यंतरी ती घरात पडल्याने तिला कमरेजवळ मार लागला. त्यामुळे ती सतत झोपूनच असते. आता तिला मोठी जखम (बेड सोर-(टीप)) झाली आहे; पण ती जखम स्वच्छ करतांना घाण वाटत नाही किंवा दुर्गंध येत नाही.

(टीप : ‘बेड सोर’ म्‍हणजे शय्‍याव्रण किंवा दाबव्रण. (अंथरुणाला खिळून राहिल्‍याने रुग्‍णाच्‍या दाब आलेल्या जागेवर झालेल्या जखमा))

२. आजी मागील पूर्ण वर्षभर अंथरुणावर एकाच स्थितीत झोपून आहे, तरी तिच्याकडे पाहून ‘तिला काही झाले आहे’, असे मला वाटत नाही.

३. आजीची सेवा करतांना माझ्याकडून आपोआप ‘मी संतसेवा करत आहे’, असा भाव ठेवला जातो.

३ इ. जाणवलेले पालट

१. तिच्या त्वचेला चकाकी आली आहे.

२. तिच्या मनात गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव जाणवतो.

३. दुखणे असह्य होत असतांनाही ती काही संतांची भजने गुणगुणते.

४. ‘ती निर्विचार स्थितीत आहे’, असे मला आणि आईला जाणवते.’

४. होमिओपॅथी वैद्या सुश्री आरती तिवारी, फोंडा, गोवा.

‘देशमुखआजींशी माझा मागील १२ वर्षांपासून परिचय आहे. त्यांची नात सौ. कविता देशमुख आणि मी वर्गमैत्रीण होतो.

४ अ. स्वीकारण्याची वृत्ती : त्यांना होत असलेल्या त्रासांविषयी त्यांनी कधी गार्‍हाणे केले नाही. ‘भोग भोगून संपवायचे आहेत’, हे त्यांनी पूर्णपणे स्वीकारले.

४ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणे : साधारण २ वर्षांपूर्वी माझी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली होती. तेव्हा त्या मला म्हणत होत्या, ‘‘माझे अजून किती भोग बाकी आहेत ग, आरती ?’’ त्यांचा पणतू चि. कृष्णा देशमुख (मुलीच्या मुलीचा मुलगा) याचे भवितव्य आणि स्वतःचे आजारपण यांची त्यांना काळजी वाटत होती. तेव्हा मी माझ्याजवळ असलेले गुरुदेवांचे एक छायाचित्र त्यांना दिले होते. त्या मला म्हणाल्या, ‘‘मी गुरुदेवांनाच प्रार्थना करते. तेच मला बळ देतात. ते माझ्यासाठी किती करतात !; पण त्यांचे स्मरण करण्यात मीच न्यून पडते.’’ त्या अधिक वेळा ‘परम पूज्य’, ‘परम पूज्य’, असा नामजप करतात. या नामजपाच्या आधारेच त्या सर्व त्रास आणि वेदना सहन करतात.

४ इ. आलेली अनुभूती

४ इ १. भ्रमणभाषवर देशमुखआजींचा आवाज ऐकून भावजागृती होणे : ‘दोन दिवसांपूर्वी आजींच्या आजारपणाच्या संदर्भात सौ. कविताशी बोलतांना मला त्यांचे ‘परम पूज्य’, ‘परम पूज्य’, असे शब्द ऐकू येऊन माझी भावजागृती झाली. ‘एक भक्त भगवंताला हाक मारत आहे, त्याचा धावा करत आहे’, असे मला जाणवले.’ तेव्हा ‘आजींची आध्यात्मिक प्रगती झाली आहे’, असे मला वाटले.’

(वरील सर्व सूत्रांचा दिनांक (१.४.२०२४))

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक