Pakistan India Relation : (म्हणे) ‘गेल्या ५ वर्षांत भारताने  काश्मीरमध्ये १३ सहस्र मुलांना गायब केले !’ – पाकिस्तान

  • पाकने संयुक्त राष्ट्रांत पुन्हा उपस्थित केले काश्मीरचे सूत्र !

  • संयुक्त राष्ट्रांनी लक्ष न दिल्याने केली टीका !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचे सूत्र उपस्थित केले. ‘आम्ही उपस्थित केलेल्या सूत्रांकडे संयुक्त राष्ट्रांनी फारसे लक्ष दिले नाही’, अशी टीकाही पाकने या वेळी केली. युद्धग्रस्त भागातून नागरिक बेपत्ता झाल्याच्या सूत्रावर झालेल्या चर्चेच्या वेळी पाकने हे सूत्र मांडले. ‘ऑगस्ट २०१९ पासून भारतीय सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये १३ सहस्र मुलांना गायब केले आहे; पण जग याविषयी गप्प आहे’, असा आरोप पाकने केला.

पाकिस्तानच्या प्रतिनिधीने सांगितले की,

१.  काश्मीरमध्ये भारतीय पोलीस आणि सुरक्षादल जे काही करत आहेत, त्याचा समावेश भयपटाच्या श्रेणीत केला जाऊ शकते. सहस्रो काश्मिरी तरुणांविषयी कोणतीही माहिती नाही.

२. काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने लोकांचे सातत्याने अपहरण केले जात आहे, ते अतिशय गंभीर आहे. काश्मीरमध्ये अशा सहस्रो महिला आहेत, ज्यांना त्यांचे पती जिवंत आहेत कि नाही ?, हे ठाऊक नाही. त्यांना काश्मीरमध्ये ‘अर्ध्या विधवा’ म्हणतात. ही एक गंभीर मानवतावादी समस्या आहे. संयुक्त राष्ट्रे आणि मानवाधिकार संघटना यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी आमची इच्छा आहे. यावर अजून गांभीर्याने चर्चा झालेली नाही, असेच म्हणावे लागेल. सशस्त्र संघर्षात हरवलेल्या व्यक्तींच्या सूत्रावर आंतरराष्ट्रीय कायद्याची आणि उत्तरदायित्व निश्‍चित करण्याच्या प्रक्रियेची कठोर कार्यवाही (अंमलबजावणी) होणे आवश्यक आहे.

संपादकीय भूमिका

गेल्या ३४ वर्षांत पाकपुरस्कृत आतंकवादामुळे पाकमध्ये सहस्राो लोकांची हत्या झाली, तर साडेचार लाख हिंदूंना पलायन करावे लागले, याविषयी पाक का बोलत नाही ?