कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खड्ड्यात पडून मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद !

पुणे – कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ‘ग्रेड सेपरेटर’साठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पडून एका १६ वर्षीय मुलीचा ९ जून या दिवशी मृत्यू झाला होता. या प्रकरणी खडीमशीन चौक ते कात्रजकडे जाणार्‍या रस्त्याच्या कामासाठी नेमलेल्या ठेकेदारावर कलम ३०४ अ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी जगदीश शिलावट यांनी कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट केली होती.

रस्त्यावर खड्डा खोदणार्‍या ठेकेदाराने खड्ड्यास कोणताही संरक्षक कठडा अथवा इतर कोणतीही संरक्षक उपाययोजना केली नव्हती. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. त्या पाण्यात पडून मृत्यू झाला. खोदलेल्या खड्ड्याला कोणत्याही प्रकारचे सुरक्षाविषयक उपाययोजनांचे पालन न केल्याचे कारण देत ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका

असा निष्काळजीपणा करणार्‍यांना कठोर शिक्षा त्वरित होणे आवश्यक ! अशा चुका न होण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना करणे आवश्यक !