संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या पालखीचे आळंदीहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्‍थान !

राज्‍याच्‍या कानाकोपर्‍यातून असंख्‍य वारकर्‍यांची मांदियाळी अलंकापुरीत दाखल !

आळंदी (जिल्‍हा पुणे) – संतश्रेष्‍ठ श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या पालखीचे ‘ग्‍यानबा तुकाराम’, ‘विठ्ठल-विठ्ठल’ नामघोष करत, टाळ मृदंगाच्‍या तालावर अत्‍यंत आनंदी वातावरणामध्‍ये मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या उपस्‍थितीमध्‍ये देऊळवाड्यातून प्रस्‍थान झाले. पालखीचा पहिला मुक्‍काम आळंदी येथील दर्शन मंडप इमारतीमध्‍ये गांधीवाडा येथे होईल. ३० जून या दिवशी पालखी आळंदीहून पुण्‍याकडे रवाना होईल.

आनंदमय प्रस्‍थान सोहळा अनुभवण्‍यासाठी राज्‍याच्‍या कानाकोपर्‍यातून लाखोंच्‍या संख्‍येने वारकरी आणि भाविक यांची मांदियाळी आळंदीमध्‍ये दाखल झाली आहे. पवित्र इंद्रायणी नदीच्‍या तिरावर सकाळपासून फेर, फुगड्या, नामघोष करत वारकर्‍यांना प्रस्‍थानापूर्वीचा आनंद घेतला. वारकर्‍यांच्‍या उपस्‍थितीमुळे पवित्र इंद्रायणीचा तीर फुलून गेला होता. सोहळ्‍यास ज्‍येष्‍ठ कृष्‍ण अष्‍टमीला म्‍हणजेच २९ जूनला पहाटे चारपासून प्रारंभ झाला. माऊलींच्‍या पादुकांच्‍या प्रस्‍थान सोहळ्‍यानिमित्त पहाटे ४ ते ५.३० वाजता माऊलींच्‍या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती आणि आरती करण्‍यात आली. दुपारी १२ ते १२.३० वाजता माऊलींना नेवैद्य दाखवण्‍यात आला. नंतर दुपारी ४ वाजता प्रस्‍थानाच्‍या मुख्‍य कार्यक्रमास आरंभ झाला. ११ ब्रह्मवृंदांच्‍या हस्‍ते माऊलींच्‍या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख करण्‍यात आला आहे. त्‍यानंतर माऊली आणि गुरु हैबतबाबा यांची आरती करण्‍यात आली. तद़्‍नंतर माऊलींचे हरिनामाच्‍या गजरात आषाढी वारीसाठी आळंदी मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्‍थान झाले.

यावर्षी पुणे येथे ३० जून आणि १ जुलै, तसेच सासवड येथे २ अन् ३ जुलै येथे २ दिवस, तसेच लोणंदला अडीच दिवस सोहळा मुक्‍कामी रहाणार आहे.

हरिपाठ, ज्ञानेश्‍वरीच्‍या ओव्‍यांचे पठण करण्‍यात वारकरी दंग !

पायी येणार्‍या दिंड्यांना गावोगावी चहा, पाणी, फराळ, जेवणाची व्‍यवस्‍था केली जात आहे. आळंदीत आलेल्‍या दिंड्यांनी शहरात ठीकठिकाणी राहुट्या उभारल्‍या आहेत. राहुट्यांमध्‍ये भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, ज्ञानेश्‍वरीच्‍या ओव्‍यांचे पठण करण्‍यात वारकरी दंग झाले आहेत. धर्मशाळा, विवाह कार्यालयांमध्‍ये माऊलींचा नामघोष चालू आहे.

५६ दिंड्यांतील प्रत्‍येकी ९० वारकर्‍यांना प्रवेश !

प्रस्‍थान सोहळ्‍याच्‍या दिवशी मंदिरात ‘श्रीं’चे रथापुढील २० आणि रथामागील २७ यांसह अन्‍य ९ उपदिंड्या अशा एकूण ५६ दिंड्यांतील प्रत्‍येकी ९० वारकर्‍यांना प्रवेश दिला जाणार आहे. जिल्‍हा सत्र न्‍यायाधीश महेंद्र महाजन यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दिंडी प्रमुख, फडकरी, मानकरी, चोपदार, महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि आळंदी देवस्‍थानचे  पदाधिकारी यांच्‍या विशेष बैठकीत हा निर्णय झाला आहे. त्‍यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्‍यास साहाय्‍य होणार आहे.