Macron Dissolves French Parliament : राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याकडून फ्रान्समधील संसद विसर्जित !

युरोपीयन युनियनच्या मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजानंतर घेतला निर्णय !

इमॅन्युएल मॅक्रॉन

पॅरीस – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संसद विसर्जित केली आहे. युरोपीयन युनियनच्या बैठकीत त्यांच्या पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. युरोपियन युनियनच्या निवडणुकीनंतर मतदानोत्तर चाचण्या (एक्झिट पोल) घेण्यात आल्या. त्यामध्ये मॅक्रॉन यांच्या सत्ताधारी ‘रेनेसान्स पक्षा’ला उजव्या विचारसरणीच्या मरीन ले पेनच्या यांच्या ‘नॅशनल रॅली पक्षा’कडून पराभव पत्करावा लागणार, असे दिसून येत आहे.

१. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये नॅशनल रॅली या पक्षाला ३१.५० टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर फ्रान्समधील सत्ताधारी रेनेसान्स पार्टीला केवळ १५.२० टक्के मते मिळणार आहेत. सोशलिस्ट पार्टी १४.३ टक्के मतांसह तिसर्‍या क्रमांकावर राहू शकते.

२. फ्रान्समध्ये संसदीय निवडणुका घोषित झाल्या आहेत. ३० जून आणि ७ जुलै या दिवशी तेथे मतदान होणार आहे. युरापीयन युनियनच्या निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर नॅशनल रॅलीचे नेते जॉर्डन बार्डेला यांनी मॅक्रॉन यांना संसद विसर्जित करण्याचे आवाहन केले होते.

मरीन ले पेन फ्रान्सच्या भावी राष्ट्राध्यक्षा बनण्याचा अंदाज !


फ्रान्समध्ये एप्रिल २०२२ मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या. यामध्ये दुसर्‍या टप्प्यातील मतदानात इमॅन्युएल मॅक्रॉन विजयी झाले होते. फ्रान्समध्ये मतदानाच्या पहिल्या टप्प्यात कोणालाही ५० टक्के मते मिळाली नाहीत, तर दुसर्‍या टप्प्यात मतदान होते. दुसर्‍या टप्प्यातील मतदानात मॅक्रॉन यांना ५८.५ टक्के, तर मरीन ले पेन यांना ४१.५ टक्के मते मिळाली. फ्रान्सच्या इतिहासात असे कधीही घडले नाही की, पहिल्या टप्प्यात ५० टक्के मते मिळवून एखादा उमेदवार राष्ट्राध्यक्ष झाला आहे.

युरोपीयन युनियनच्या निवडणुकीत उजव्या पक्षांचे वर्चस्व !

सध्या युरोपमध्ये युरोपीयन युनियनच्या निवडणुका होत आहेत. फ्रान्ससह २० देशांमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान झाले. २७ देशांचा समावेश असलेल्या युरोपीयन युनियनमध्ये ३७ कोटींहून अधिक मतदार आहेत. त्यांनी ७२० जागांसाठी मतदान केले आहे. हे खासदार युरोपीयन कमिशन चालवतील. बहुतांश मतदानात उजव्या विचारसरणीच्या पक्षांना या वेळी अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.