वणी (यवतमाळ), ९ जून (वार्ता.) – तालुक्यातील मंदर गावाजवळ सातवाहन काळातील म्हणजे १८०० वर्षांपूर्वीचे ‘धंदर’ नावाचे प्रगत शहर सापडल्याचे पुराव्यावरून सिद्ध झाले आहे, अशी माहिती प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे. एका शेतकर्याला सापडलेल्या नाण्यांचे परीक्षण, इतिहासकारांचे म्हणणे आणि त्यांनी केलेल्या संशोधनावरून हा काळ समजला आहे. दख्खनच्या पठारावरील पशूपालक राजघराणे ज्याचा विस्तार महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात होता. सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता. या साम्राज्याचा राजा सिमुक सातवाहन हाच या साम्राज्याचा संस्थापक मानला जातो.
धंदर हे सातवाहन कालीन प्रगत शहर हे आताच्या मंदर गावासमीप असल्याने अजूनही बर्याच वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, सोने-चांदीचे अलंकार अशा प्राचीन अनेक वस्तू मिळत असतात. या परिसराचे पुरातत्व विभाग वा नागपूर विद्यापिठाने संशोधन केल्यास नाविन्यपूर्ण इतिहास अभ्यासकांना मिळू शकतो, असे संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांचे म्हणणे आहे.