Kerala MP Suresh Gopi : भाजपच्या केरळमधील एकमेव खासदाराने मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता ते पद सोडण्याच्या सिद्धतेत !

भाजपचे केरळमधील खासदार सुरेश गोपी

नवी देहली – केंद्रीय मंत्रीमंडळाचा शपथविधी ९ जूनला झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी यातील सुरेश गोपी यांनी मंत्रीपद सोडण्याचे विषयी विधान केले आहे. सुरेश गोपी केरळमधून पहिल्यांदाच निवडून आले आहेत. ते केरळमधील भाजपाचे पहिले आणि एकमेव खासदार आहेत. गोपी यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

सुरेश गोपी यांनी नवी देहली एका मल्ल्याळम् वृत्तवाहिनीशी बोलतांना म्हटले, ‘मी काही चित्रपट स्वीकारले आहेत. मला त्यात काम करायचे आहे. मी माझा मतदारसंघ त्रिशूरचा खासदार म्हणून काम करत रहाणार आहे. मला केवळ खासदार म्हणून काम करत रहायचे आहे. मी त्यांच्याकडे (पक्षश्रेष्ठींकडे) काहीच मागितले नव्हते. मी त्यांना म्हटले होते की, मला या पदाची आवश्यकता नाही. मला वाटते की, लवकरच पदमुक्त होईन; मात्र त्रिशूरमधील मतदारांची मी हानी होऊ देणार नाही. त्यांच्यासाठी आणि मतदारसंघासाठी मी काम करत राहीन. माझ्या मतदारांनाही याची कल्पना आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो की, मी त्यांच्यासाठी खूप चांगले काम करेन आणि त्यांनाही याची कल्पना आहे; म्हणूनच तर त्यांनी मला त्यांची मौल्यवान मते दिली आहेत; मात्र मला मंत्रीपद सांभाळता येणार नाही; कारण कोणत्याही परिस्थितीत मला माझे चित्रपट पूर्ण करायचे आहेत.’’