‘स्मार्ट सिटी’च्या कामामुळे सांत इनेझ, पणजी येथील श्री ताडमाड मंदिराला धोका !

पणजी, ९ जून (वार्ता.) – शहरात चालू असलेल्या ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे सांत इनेझ, पणजी येथील श्री ताडमाड मंदिर आणि वडाचे झाड यांना धोका निर्माण झाला आहे. सांत इनेझ येथे ‘स्मार्ट सिटी’च्या कामामुळे रस्त्याच्या मधोमध खोदकाम करण्यात आले आहे आणि यामुळे रस्त्याच्या बाजूंचे कठडे कोसळू लागले आहेत. मंदिराच्या टाईल्स घातलेल्या ठिकाणीही भूमीला भेगा पडल्या आहेत. या ठिकाणी मोठी हानी होऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

मुसळधार पावसामुळे ‘स्मार्ट सिटी’चे काम पूर्ण करण्याची आणखी एक अंतिम मुदत चुकण्याची शक्यता

पणजी – पावसाळा चालू झाल्याने आणि सलग गेले २ दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने शहरात चालू असलेली ‘स्मार्ट सिटी’ची कामे करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे काकुलो मॉल-अग्नीशमन सेवा जंक्शन येथील मलनिस्सारण चेंबरचे काम थंडावले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी १० जून अंतिम दिनांक ठरवण्यात आला होता. ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकार्‍यांच्या मते जंक्शनजवळील काम पुढील आठवड्यात पूर्ण करून हा भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. शहरात अन्य ठिकाणी, तसेच रायबंदर येथे ‘स्मार्ट सिटी’चे बहुतांश काम पूर्ण झालेले असले, तरी कामाचा अंतिम टप्पा राहिलेला आहे. ही कामे पूर्ण होण्यासाठी हवामान अनुकूल होणे आवश्यक आहे.