मायमराठीची शोकांतिका !

साधारण २०-३० वर्षांपूर्वीपर्यंत तरी ‘इंग्रजी’ या विषयाची विद्यार्थ्यांना भीती वाटायची आणि मातृभाषा मराठी जवळची वाटत असे. त्यामुळे १० वी आणि १२ वीमध्ये इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण होणार्‍यांचे प्रमाण मराठीच्या तुलनेत अधिक असायचे. आता मात्र संपूर्ण चित्र पालटलेले आहे. यंदाच्या दहावीच्या निकालात मराठी विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या इंग्रजी विषयातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या चक्क सहा पट अधिक आहे. महाराष्ट्रातील जनता, ज्यांची मायमराठी ही मातृभाषा आहे, तिथे हे चित्र अत्यंत लाजिरवाणे आहे. दहावीच्या निकालाची ही स्थिती बघता इंग्रजांनी दोन शतकांपूर्वी बघितलेले स्वप्न पूर्ण झाल्याचे प्रत्ययास येते. हळूहळू का होईना; पण सामान्य माणसाच्या जीवनातील मराठी भाषेचे प्रभुत्व, वर्चस्व इंग्रजांनी नष्ट केले आहे आणि आम्ही मायमराठीची लेकरे यासाठी इंग्रजांना साहाय्यक ठरलो. ही माय मराठीची शोकांतिका आहे ! विद्यार्थ्यांना ‘मराठी’ शिकण्यासाठी आणि लिहिण्यासाठी अवघड का वाटते ? त्यात रस का वाटत नाही ? याच्या मुळाशी जायला हवे. मुळात मातृभाषेत वेगळे शिकावे काय लागते ? पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे असणारा ओढा, मुलाला शाळेत चांगले इंग्रजी बोलता यायला हवे, यासाठी आपसूकच पालकांचे त्याच्याशी इंग्रजीत होणारे संभाषण, पर्यायाने कुटुंबात मराठी मातृभाषेला दिला जाणारा दुय्यम दर्जा यांमुळे पाल्यांवर मराठीचे ‘संस्कार’च होत नाहीत. मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचे, हे आधीच ठरलेले असल्यामुळे घरीही ‘गुड मॉर्निंग’, ‘गुड नाईट’ आणि ‘ए फॉर ॲप्पल’ असेच इंग्रजीकरण होते. त्यामुळे ‘अ’ अध्यात्माचा’, ‘आ’ आईचा’ दूरच रहातो.

सध्या शाळांमधून उत्तम मराठी विषय शिकवणार्‍या शिक्षकांचाही अभाव आहे. मराठी शिकवणारे शिक्षकही पोटार्थी झाले आहेत. ‘मराठी भाषेतील वैविध्य, व्याकरणाचे सौंदर्य, मराठी भाषेची वैशिष्ट्ये मुलांच्या मनावर बिंबवून विद्यार्थ्यांना घडवायचे आहे, मराठी विषयाविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करायची आहे’, हा उदात्त विचार लयास गेला आहे. पूर्वी मराठी विषय शिकवणारे शिक्षक त्या विषयाची पदविका संपादन केलेले असत. ते मनापासून आणि तळमळीने शिकवत. गेल्या काही वर्षात ही स्थिती पालटली आहे. काही शाळांमध्ये तर एकच शिक्षक सगळे विषय शिकवतो. त्यामुळे त्या विषयातील प्राविण्य त्यांच्याकडेच नाही, तर ते विद्यार्थ्यांमध्ये कुठून येणार ? शाळा, शिक्षण विभाग, कागदोपत्री असलेली धोरणे, शिक्षक आणि पालक या सर्वांनीच मराठीला मरणासन्न स्थितीत आणून ठेवले आहे. मराठी या भाषेची लिपी ही ‘देवनागरी’ आहे. हा शब्द मराठी भाषेची महती सांगण्यासाठी पुरेसा आहे. याची जाण ठेवून वरील सर्व घटकांनी येणार्‍या पिढीवर ‘मराठी’चे संस्कार केले पाहिजेत !

– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.