‘२३.५.२०२४ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘स्वतःच्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मृत्यूविषयीचे विचार मनात आल्यावर ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) बाळासाहेब विभूते यांची झालेली विचारप्रक्रिया !’ असा लेख प्रकाशित झाला होता. या लेखातील ‘माझ्या मृत्यूनंतर किंवा पुढच्या जन्मात माझे गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला भेटतील का ? तेव्हा मी त्यांना कसा ओळखणार ?’, या प्रश्नाने माझे मन कासावीस होत होते’, हे वाक्य वाचल्यावर मला पू. सौरभ जोशी (सनातनचे विकलांग संत, वय २८ वर्षे) यांच्या संदर्भातील एक प्रसंग आठवला.
१. पू. सौरभ जोशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील ईश्वरी तत्त्वाला ‘श्री’ असे संबोधत असणे आणि ‘श्रींची इच्छा असल्यास पू. सौरभ जोशी पुन्हा जन्म घेतात’, असे त्यांनी सांगणे
पू. सौरभ जोशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘श्री’ असे संबोधतात. ते ‘श्री, श्री, श्री’ असा जप करतात. एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पू. सौरभ जोशी यांना दर्शन देण्यासाठी त्यांच्या खोलीत आले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला सांगितले, ‘‘पू. सौरभला विचारा की, ते ‘श्री, श्री, श्री’, असे कुणाला म्हणतात ?’’ मी याविषयी पू. सौरभदादांना विचारले. तेव्हा आमच्यामध्ये पुढील संभाषण झाले.
मी (श्री. संजय जोशी) : पू. दादा, तुम्हाला दर्शन देण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर येतात. त्यांना तुम्ही ‘श्री’ असे म्हणता ना ?
पू. दादा : नाही.
मी : त्यांच्यातील परमेश्वरी तत्त्वाला ‘श्री’ म्हणता का ?
पू. दादा : हो.
मी : जेव्हा ‘श्री’ अवतार घेतात, तेव्हा तुम्हीही जन्म घेता का ?
पू. दादा : नाही.
मी : श्रींची इच्छा असली, तर तुम्ही जन्म घेता का ?
पू. दादा : हो.
२. परमेश्वराच्या अवताराच्या वेळी त्याचे रूप कोणतेही असले, तरी साधकाने त्या तत्त्वाची साधना केल्यावर साधकाला अवताराच्या रूपाला ओळखता येणे
तेव्हा माझ्या मनात ‘परमेश्वर प्रत्येक अवताराच्या वेळी वेगवेगळी रूपे घेतो. त्यामुळे श्रींच्या इच्छेने जेव्हा साधकांचा जन्म होईल, तेव्हा श्रींचे रूप वेगळे असले, तरी त्यांच्यातील मूळ तत्त्वाशी एकरूप झालो की, साधकांना त्यांना ओळखणे सोपे जाते. या दृष्टीने पू. दादांनी उत्तर दिले असावे’, असे विचार आले. मी पू. दादांना विचारले, ‘‘परमेश्वराच्या (श्रींच्या) अवताराच्या वेळी त्याचे रूप कोणतेही असले, तरी त्या तत्त्वाची साधना केली की, त्याला ओळखता येते का ?’’ तेव्हा ते मला ‘हो’ म्हणाले.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधक आणि संत यांना स्वतःच्या स्थूल देहात अडकू न देणे
परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना आश्वस्त केले आहे,
‘स्थूल देहा असे, स्थळकाळाची मर्यादा ।
कैसे असू सर्वदा सर्वाठायी ।
सनातन धर्म माझे नित्य रूप ।
त्या रूपे सर्वत्र आहे सदा’।।
‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांना स्वत:च्या स्थूल देहात न अडकवता ईश्वराच्या दिशेने वाटचाल करायला शिकवतात’, हे शिकायला मिळाले.’
– श्री. संजय जोशी (पू. सौरभ जोशी यांचे वडील), कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (२४.५.२०२४)