सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी बनवलेल्या रथातून प्रक्षेपित झालेली स्पंदने

‘११.५.२०२३ या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव  सप्तर्षींनी नाडीपट्टीत लिहिल्याप्रमाणे साजरा करण्यात आला. सप्तर्षींनी लिहिल्याप्रमाणेच साधकांनी लाकडाचा एक सुंदर रथ बनवला होता. त्या रथामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले विराजमान झाले. त्यांच्यापुढे त्यांच्या उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघीही विराजमान झाल्या. मोठ्या मैदानात साधकांनी तिन्ही गुरु असलेला हा रथ ओढत फिरवला. त्या वेळी हा ब्रह्मोत्सव बघायला साधक भोवती ‘स्टेडियम’मध्ये बसतात, तसे बसले होते. ब्रह्मोत्सवातील या रथातून प्रक्षेपित झालेली स्पंदने येथे दिली आहेत.

रथामध्ये आरुढ झालेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांवर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ फुले वहातांना आणि समवेत श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

विविध स्थितीत ब्रह्मोत्सवातील रथातून प्रक्षेपित झालेली स्पंदने !

१. ब्रह्मोत्सवापूर्वी रथ

या रथाचा आराखडा साधकांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. काशीनाथ कवठेकरगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली बनवला होता. ‘रथातून विष्णुतत्त्व प्रक्षेपित व्हावे’, यासाठी साधकांचे प्रयत्न होते. कलेशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी योग्य असा आराखडा बनवल्यावर सुतार-विभागातील साधकांनी रथ प्रत्यक्ष बनवला. संतांच्या मार्गदर्शनाखाली आणि भावपूर्णपणे बनवल्यामुळे या रथातून ब्रह्मोत्सवापूर्वीच चांगली स्पंदने प्रक्षेपित होत होती.

जेव्हा हा रथ मी पुढून बघितला, तेव्हा त्यातून चैतन्य आणि आनंद यांच्याबरोबर शक्तीची स्पंदनेही अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत होती; कारण या रथामध्ये अजून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आसनस्थ झाले नव्हते. शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या स्पंदनांमध्ये शक्तीची स्पंदने सर्वांत कनिष्ठ स्तराची असतात.

‘जेव्हा हा रथ मी मागून बघितला, तेव्हा या रथातून प्रक्षेपित होणारी शक्ती आणि चैतन्य यांची स्पंदने न्यून झाली; कारण ही स्पंदने रथातून मुख्यत्वे पुढून प्रक्षेपित होतात’, असे मला जाणवले. रथाच्या मागून शांतीची स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत होती, तसेच भावाची स्पंदनेही अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत होती. ‘रथाचे मागून दर्शन घेतांना त्यातून प्रक्षेपित होणारी शक्ती आणि चैतन्य यांची स्पंदने न्यून झाल्यामुळे रथातून प्रक्षेपित होणारी भावाची स्पंदने मला जाणवली’, असे मला वाटले.

सध्याच्या कलियुगातील ‘न भूतो न भविष्यति ।’ असा ब्रह्मोत्सवासाठी बनवलेला रथ

१ अ. रथातून प्रक्षेपित होत असलेली देवतातत्त्वे आणि त्यांचे प्रमाण

रथातून सर्वाधिक प्रमाणात श्रीविष्णूचे तत्त्व प्रक्षेपित झाल्याचे जाणवले. यावरून ‘कला’ आणि ‘सुतार’ या विभागांतील साधकांनी किती अचूकतेने रथाचा आराखडा बनवून तो प्रत्यक्ष बनवला आहे, हे लक्षात येते.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

२. तिन्ही गुरु रथामध्ये बसल्यावर

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांच्या दोन्ही उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ असे तिन्ही गुरु रथामध्ये बसल्यावर रथातून प्रक्षेपित होणारी शक्तीची स्पंदने अगदी नगण्य झाली; म्हणून ती शून्य टक्के दिली आहेत. तिन्ही गुरु रथामध्ये बसल्यामुळे रथातून आनंद आणि भाव यांच्या स्पंदनांचे प्रक्षेपण वाढले.

३. रथामध्ये आरुढ झालेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांवर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी फुले वहाणे

देवाला भावपूर्णपणे फुले अर्पण केल्यामुळे त्या निर्गुण देवातील देवतातत्त्व जागृत होते. येथे तर अध्यात्मातील उच्च पदावर विराजमान असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांवर फुले वाहिली. त्यामुळे भावाची स्पंदने प्रक्षेपित होणारच ! त्याप्रमाणेच साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भावजागृती झाली. त्यामुळे त्या वेळी रथातून भावाची स्पंदने सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित झाल्याचे मला जाणवले.

४. ब्रह्मोत्सव झाल्यावर रिकामा रथ

ब्रह्मोत्सव झाल्यावर तिन्ही गुरु रथातून उतरले. त्यानंतर ‘रथातून प्रक्षेपित होणारे आनंद आणि शांती यांचे प्रमाण पूर्णपणे थांबले अन् केवळ भाव आणि चैतन्य यांचे प्रक्षेपण होऊ लागले’, असे मला जाणवले.

या परीक्षणातून भाव आणि कार्य यांनुसार स्पंदने कशी पालटतात, ते लक्षात येते. गुरुकृपेनेच हे सर्व शिकायला मिळाले, यासाठी गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१६.५.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक