मुंबई, ७ जून (वार्ता.) – या वर्षी १५ जूनपासून शाळा चालू होणार आहे. शाळा चालू होण्यापूर्वी राज्यातील शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इयत्ता १ ली ते ८ वी मधील ४४ लाख ६० सहस्र विद्यार्थ्यांना शासनाकडून विनामूल्य गणवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला २ गणवेश विनामूल्य देण्यात येणार आहेत. शाळा चालू होण्यापूर्वी १ गणवेश दिला जाणार आहे, तर दुसरा गणवेश कालांतराने दिला जाणार आहे.
गणवेश शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळाकडे देण्यात आले आहे. महामंडळाच्या अंतर्गत महिला बचत गटांकडून गणवेश शिवून घेण्यात येणार आहेत. प्रत्येक गणवेशामागे शिलाईसाठी ११० रुपये देण्यात येणार आहेत. यासह प्रत्येक विद्यार्थ्याला एक बुटाचा जोड दिला जाणार आहे. त्यासाठी १७० रुपये प्रतीविद्यार्थ्यामागे शाळा व्यवस्थापन समितीकडे दिले जाणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
असा असेल गणवेश ?गणवेश स्काऊट आणि गाईड विषयाला अनुरूप असणार आहे. मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट, तसेच मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असे स्वरूप असेल. ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल, तर सलवार गडद निळ्या रंगाची आणि कमीज आकाशी रंगाची असेल. |