रायगडावर येणारे शिवभक्त आणि मावळे यांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे यांचे ‘आमरण उपोषण’ !

  • प्रशासनाने ३ दिवसांत रायगडावरील ‘रिसॉर्ट’ न हटवल्यास आम्ही ते हटवणार ! – ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे यांची चेतावणी

  • उपोषणाला राज्यातून शिवप्रेमींचा पाठिंबा !

रायगडावर विविध सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी ‘आमरण उपोषणा’स (मध्यभागी) बसलेले ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे

रायगड, ७ जून (वार्ता.) – छत्रपती श्री शिवरायांची समाधी, हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि संपूर्ण हिंदुस्थानचे शक्तीस्थळ असलेल्या रायगडावर गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, निवार्‍याची सोय यांसह इतर मूलभूत सुविधांचा अभाव आहे. देशात इतर विकासकामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; मात्र शिवरायांच्या गडांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रायगडावर येणार्‍या शिवप्रेमी आणि मावळे यांना मूलभूत सुविधा सरकारने द्याव्यात, या मागणीसाठी ६ जूनपासून आळंदी (जिल्हा पुणे) येथील युवा कीर्तनकार आणि सुप्रसिद्ध व्याख्याते ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे यांनी ‘आमरण उपोेषण’ चालू केले आहे. या उपोषणाला राज्यातून हिंदु तरुणांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. रायगडावरील ‘रिसॉर्ट’ प्रशासनाने ३ दिवसांत हटवावे अन्यथा आम्ही ते काढू’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.

प्रशासकीय अधिकार्‍यांना भूमिका मान्य, १७ तालुक्यांतील शिवभक्तांनी पाठिंबा कळवला !  

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे म्हणाले, ‘‘मी उपोषणाला बसल्यानंतर आतापर्यंत ३ वेळा प्रांताधिकारी, तहसीलदार सांगळे, पोलीस अधिकारी आणि आरोग्य विभागातील आधुनिक वैद्य येऊन मला भेटून गेले आहेत. त्यांनाही माझ्या आंदोलनाची भूमिका मान्य आहे. आतापर्यंत मला १७ तालुक्यांतील हिंदुत्वनिष्ठ आणि शिवभक्त यांनी पाठिंबा दिला आहे, तसेच सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी आणि बार्शी येथील शिवप्रेमींनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही.’’

आंदोलनाला पाठिंबा आहे, असे सांगण्यासाठी आलेले टेंभुर्णी (जिल्हा सोलापूर) येथील कुटुंब (संकेतस्थळ)

ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे यांच्या मागण्या

गडावरील पायरीमार्गावर आणि पायथ्याशी फिल्टर बसवून पिण्याच्या पाण्याची सोय करावी. गडावर स्वच्छता गृह आणि महिलांसाठी ‘चेंजिग रूम’ बांधावी. महाड एस्.टी. ते रायगड येथे प्रत्येक घंट्याला शटल एस्.टी. चालू करावी. आळंदी (जिल्हा पुणे) ते रायगड येथे पहिली एस्.टी. बस सेवा चालू करावी. रोपवे (दोरखंडाच्या साहाय्याने पुढे जाणारी स्वयंचलित ट्रॉली) तिकीट अल्प करून प्रत्येक मावळ्यांना १ फेरी १०० रुपये कायमस्वरूपी करण्यात यावी. शिवप्रेमींकडून आकारले जाणारे २५ रुपये प्रवेश शुल्क कायमस्वरूपी बंद करावे. पाचाड येथील जिल्हा परिषदेची धर्मशाळा कायमस्वरूपी येणार्‍या मावळ्यांना निवार्‍यासाठी उपलब्ध करून द्यावी. रोपवे आस्थापनाकडून ९०० रुपये घेऊन रायगडावर रहाण्यासाठी ऑनलाईन नोंद केली जाते, ती रहित करून तेथे शिवप्रेमीस रहाण्याची अनुमती द्यावी किंवा सरसकट रहाण्यास बंदी करण्यात यावी. तीर्थक्षेत्र आराखड्यात रायगडास शासनाने ‘अ’ दर्जाची श्रेणी देऊन रायगडाचा विकास करावा. गड महामंडळाची स्थापना करण्यात यावी. रायगडावर ३६५ दिवसांतील २४ घंटे नगारखाण्यासमोर भगवा ध्वज फडकत ठेवण्यात यावा. गडावर होणारी कामे दर्जेदार व्हावीत. मनोरे यांचे सुशोभिकरण आणि संरक्षण करण्यात यावे. उगवलेले गवत काढावे, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन चालू आहे.