नर्मदेतील गोट्यांविषयीची माहिती !

आपण किती सहज एखाद्याला नाव ठेवतांना ‘नर्मदेतील गोटा’ असे म्हणतो नाही ? पण यामागचा विचार कधीतरी गांभीर्याने करतो का ? पौराणिक कथेनुसार नर्मदेला शंकराने वर दिला की, तिच्या पात्रातील प्रत्येक दगड हा साक्षात् शिवस्वरूप असेल. त्यामुळे नर्मदेतील गोटे हे शिवस्वरूप असतात. तिच्या प्रवाहात गोल फिरल्याने नैसर्गिकरित्या गरगरीत झालेले नर्मदेश्वर शिवलिंग आता फारशी मिळत नसले, तरी हे दगड गोटे बाहेर काढून पॉलिश करून त्याची शिवलिंग सिद्ध केलेले मिळतात.

वैद्य परीक्षित शेवडे

नर्मदेश्वर शिवलिंगाचे वैशिष्ट्य असे की, त्यांना कुठल्याही प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नसते. इतकेच नाही, तर रंगानुसार या लिंगांवर शिवाच्या विशिष्ट स्वरूपाची किंवा शिव परिवारातील अन्य देवतांची स्थापना करण्याची पद्धतही तंत्रमार्गात आहे. घरातील देवघरात नर्मदेश्वर पूजनाची पद्धत प्राचीन काळापासून आहे.

घरात काय काय पुजावे ? यात समर्थ म्हणतात,

‘सीळा सप्तांकित नवांकित । शालिग्राम शकलें चक्रांकित ।
लिंगें सूर्यकांत सोमकांत । बाण तांदळे नर्बदे ।।’

– दासबोध, दशक ४, समास ५, ओवी ६

अर्थ : ७ किंवा ९ शुभचिन्हे असलेले दगड शाळिग्राम, चक्रांकित दगडाचे तुकडे, शिवलिंगे, सूर्यकांत, चंद्रकांत मणी, शंकराचे बाण, तांदळे आणि नर्मदेतील गोटे.

यातील नर्बदे लिंग म्हणजेच नर्मदेश्वर होय. अनेकदा देवघरात परंपरेने चालत आलेले नर्मदेतील गोटे, म्हणजेच नर्मदेश्वर असतात. आपल्याला त्याची माहिती नसते आणि अगदी नकळत या शब्दाचा अपप्रयोग आपल्याकडून होत असतो; म्हणून ही तोंडओळख !

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (१.६.२०२४)