१. बारामती – ज्या लढतीकडे राज्याचेच नाही, तर देशाचे लक्ष होते, ती लढत म्हणजे बारामती येथील अजित पवार यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. सुनेत्रा पवार आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्यात झाली. या लढतीत सौ. सुप्रिया सुळे यांनी ८८ सहस्रांहून अधिक मतांनी विजय मिळवला.
२. पुणे – पुण्यातील काँग्रेसचे खासदार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली होती. पुण्यातील विकासप्रश्नांसमवेत येथे थेट मशिदीतून काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करण्याचे फतवे निघाले. याचा उल्लेख राज ठाकरे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केला. शेवटी येथे भाजपचे श्री. मुरलीधर मोहोळ विजयी झाले.
३. मावळ मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाले आहेत, तर नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे यांनी शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांचा पराभव केला.
४. सातारा – सातारा येथे गत वेळेस श्रीनिवास पाटील यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. यानंतर दोन वर्षांनी छत्रपती उदयनराजे हे खासदार झाले. यंदा श्रीनिवास पाटील यांनी ‘निवडणूक लढवणार नाही’, असे सांगितले. त्यामुळे यंदा ही लढत भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यात झाली. यात भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले विजयी झाले.
५. शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आढळराव पाटील यांचा पराभव केला. नगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नीलेश लंके हे विजयी झाले. त्यांनी भाजपचे डॉ. सुजय विखे-पाटील यांचा पराभव केला.
६. काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असतांनाही सांगलीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळाल्याने काँग्रेसचे विशाल पाटील यांनी येथे बंडखोरी केली. त्यामुळे येथे ठाकरे गटाचे पैलवान चंद्रहार पाटील, विशाल पाटील आणि भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली. या लढतीत अपक्ष विशाल पाटील हे निवडून आले आहेत.
७. कोल्हापूर
अ. राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर येथे ७९.५९ टक्के मतदान झाले होते, तर हातकणंगले येथे ७१.११ टक्के मतदान झाले होते. कोल्हापूर जिल्हा मतदारसंघ येथे काँग्रेसने छत्रपती शाहू महाराज यांना तिकीट दिले. त्यामुळे वंचित आणि ‘एम्.आय.एम्.’ने येथे उमेदवार दिला नाही. शाहू महाराज यांची पुरोगामी विचारधारा, तर संजय मंडलिक यांची शिवसेना म्हणजे हिंदुत्वाची विचारधारा होती. अखेर या लढतीत काँग्रेसचे शाहू महाराज १ लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले.
आ. हातकणंगले मतदारसंघात तिरंगी लढत झाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सत्यजीत पाटील-सरुडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यात तिरंगी लढत झाली. येथे शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने हे १४ सहस्र ७२३ मतांनी विजयी झाले आहेत.
८. सोलापूर – यंदा काँग्रेसचे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात लढत झाली. प्रणिती शिंदे या सोलापूर येथील, तर राम सातपुते बाहेरील अशी टीका काँग्रेसने केली. यंदा मात्र या मतदारसंघात दोन वेळा काँग्रेसचा पराभव झालेला असतांना प्रणिती शिंदे विजयी झाल्या. त्यांनी भाजपचे उमेदवार श्री. राम सातपुते यांचा ४० सहस्रांहून अधिक मतांनी पराभव केला.
९. धाराशिव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दीड लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला. लातूर येथे काँग्रेसचे शिवाजीराव काळगे हे विजयी झाले आहेत.
१०. माढा येथे गत वेळचे भाजपचे खासदार रणजित निंबाळकर आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात थेट लढत झाली. अखेर यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील विजयी झाले.
११. नांदेड मध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण यांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करून विजय मिळवला.
१२. बीड येथे भाजपच्या पंकजा मुंडे या पहिल्या मतमोजणीमध्ये पराभूत झाल्या. त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. रात्री ८.४५ पर्यंत त्याविषयी कुठलीही माहिती हाती आली नव्हती. त्यांच्या विरोधात शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनावणे हे उभे होते.
कर्नाटक
१. चिकोडी येथे भाजपचे विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्यात लढत झाली. यात काँग्रेसच्या प्रियांका जारकीहोळी विजयी झाल्या.
२. बेळगाव – भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या बेळगाव शहरात यंदा जगदीश शेट्टार यांना उमेदवारी देण्यात आली होती. येथे काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत झाली. या लढतीत भाजपचे जगदीश शेट्टार विजयी झाले आहेत.