‘बिंदूदाबन’ – आपत्काळासाठी संजीवनी असलेली एक चिकित्सापद्धत !

 ३ जून या दिवशी आपण ठाणे येथे २ ते ४ जून २०२३ या कालावधीत झालेल्या बिंदूदाबन शिबिरात उपचार केलेल्या रुग्ण साधकांना आणि उपचार करणार्‍या साधकांना आलेल्या अनुभूती पाहिल्या आहेत. उपचार शिकण्यासाठी आलेल्या शिबिरार्थींनी डॉ. दीपक जोशी यांचा असलेला भाव अनुभवला आणि पाहिला. त्यामुळे ‘शिबिरानंतर प्रत्यक्ष सराव सेवा करतांना साधिकांनी काय अनुभवले ?’, ते लेखातील पुढील अनुभूतींतून पहाणार आहोत.                 

(भाग ३)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/800152.html

२. बिंदूदाबन उपचार शिकण्यासाठी आलेल्या शिबिरार्थींनी रुग्ण साधकांचे बिंदूदाबन भावाच्या स्तरावर केल्यावर झालेला आध्यात्मिक लाभ

२ अ. सौ. जयश्री पाटील, नवी मुंबई.

२ अ १. ‘उपचार करून घेणारी रुग्ण साधिका म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरु अनुराधा वाडेकरताईच आहेत’, असा भाव ठेवल्यावर बिंदू दाबण्यासाठी शक्ती अल्प पडत असूनही ‘बिंदूदाबन करतांना देवच शक्ती पुरवत आहे’, असे जाणवणे : ‘ज्या साधिकेवर मी बिंदूदाबनाचा सराव करत होते, ‘ती साधिका प्रत्यक्ष सद्गुरु अनुराधा वाडेकरताईच आहेत’, असा मी भाव ठेवला. सराव आरंभ करण्याआधी परम पूज्य गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, मी अज्ञानी आहे. मला काहीच येत नाही. तेव्हा तुम्हीच माझ्याकडून अचूक बिंदूदाबन करून घ्या. सेवा करतांना सतत माझा नामजप चालू असायचा. बिंदूवर दाब देण्यासाठी माझी शक्ती अल्प पडत होती; पण ‘बिंदूदाबन करतांना बोटात देवच शक्ती पुरवत आहे’, असे माझ्या लक्षात आले. बिंदूदाबन करून मला थकवा आला नाही कि माझे हातही दुखले नाहीत, तसेच मला आध्यात्मिक लाभही झाले.

डॉ. दीपक जोशी

२ अ २. ‘सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरच बिंदूदाबन करत आहे’, असा भाव ठेवल्यावर एकाग्रतेने नामजप होणे : एक दिवस मी सौ. सुजाता शेट्येताई यांच्यावर बिंदूदाबनाचा सराव करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे प्रार्थना केली. त्यानंतर ‘हे हात गुरुमाऊलीचेच हात आहेत आणि त्यांवर मी बिंदूदाबनाचा सराव करत आहे’, असा भाव मी ठेवला. तेव्हा माझ्याकडून पुष्कळ एकाग्रतेने अखंड नामस्मरण झाले. यापूर्वी मी कधी असे अनुभवले नव्हते. तसेच पायांचे बिंदूदाबन करतांना ‘सद्गुरु अनुराधा वाडेकरताईंचेच पाय आहेत आणि मी सद्गुरु अनुराधाताईंच्याच पायांवर बिंदूदाबन करत आहे’, असा भाव मी ठेवला होता. तेव्हाही माझे एकाग्रतेने आणि अखंड नामस्मरण झाले.

२ अ ३. कृतज्ञता व्यक्त करतांना ‘सद्गुरु अनुराधाताई प्रसन्न दृष्टीने पहात आहेत’, असे दिसणे : बिंदूदाबन झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करत असतांना सद्गुरु अनुराधाताईंचा चेहरा डोळ्यांपुढे दिसला आणि ‘सद्गुरु अनुराधाताई प्रसन्न दृष्टीने माझ्याकडे पहात आहेत’, असे मला दिसले. तेव्हा ‘हा भास आहे का ?’, असा विचार येऊन मी पुन्हा डोळे बंद केले, तरी मला पुन्हा तेच दृश्य दिसले. त्या वेळी सद्गुरु अनुराधाताईंप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

२ आ. सौ. सुजाता शेट्ये, मुलूंड, मुंबई. 

२ आ १. साधिका बिंदूदाबन उपचार करत असतांना ‘शरिरातील सर्व शिरा मोकळ्या होत आहेत आणि आध्यात्मिक लाभ होत आहेत’, असे रुग्ण साधिकेला जाणवणे : ‘सौ. जयश्री पाटीलताई माझ्या शरिराच्या ज्या भागावरील बिंदूंवर दाब देत होत्या, त्या त्या भागात मला वेगळ्याच संवेदना जाणवत होत्या. ‘माझ्या शरिरातील सर्व शिरा मोकळ्या होत आहेत आणि माझ्या पाचही बोटांतून काहीतरी निघत आहे’, असे मला जाणवत होते. जेव्हा जयश्रीताई माझ्या तळहातावरील बिंदूंवर दाब देत होत्या, त्या वेळी ‘मला आध्यात्मिक लाभ होत आहेत. तसेच माझे दात आतून शिरशिरी आल्यासारखे हलत आहेत’, असे मला जाणवत होते. त्या वेळी मला गुरूंप्रती कृतज्ञता वाटून माझी भावजागृती होत होती. जयश्रीताई जिथे जिथे बिंदूदाबन करत होत्या, त्या त्या जागी मला पुष्कळ हलकेपणा जाणवत होता.

२ आ २. ‘सद्गुरु अनुराधा वाडेकरताईच बिंदूदाबन उपचार करत आहेत’, असे जाणवून कृतज्ञता वाटणे : गुडघ्याच्या त्रासामुळे त्यावर बिंदूदाबन करतांना मला असह्य वेदना होत होत्या. त्या वेळी ‘मी परम पूज्य गुरुदेव, सद्गुरु अनुराधाताई आणि पू. जाधवकाकू यांना आळवत होते. त्यांच्या कृपेमुळे माझ्यावर बिंदूदाबनाचे उपाय होत आहेत’, असा उत्कट भाव जागृत होऊन मला ‘सद्गुरु अनुराधाताईच माझ्यावर बिंदूदाबन करत आहेत’, असे जाणवू लागले. त्याबद्दल सद्गुरु अनुराधाताईंप्रती कृतज्ञता वाटत होती. तेव्हा मला पू. (सौ.) संगीता जाधवकाकूंचे शब्द आठवले, ‘‘सद्गुरु ताईंच्या माध्यमातून गुरुतत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. सद्गुरु ताईंना सांगितलेले गुरुदेवांपर्यत पोचते.’’ त्यानंतर माझ्या पायातील शिरा पुष्कळ मोकळ्या झाल्या. माझ्या पायांना पुष्कळ हलकेपणा आला. ‘माझ्या शरिरामध्ये साठलेली त्रासदायक शक्ती निघून जात आहे’, असेही मला जाणवले.’

२ इ. सौ. अनिता जमदाडे, डोंबिवली, ठाणे.

२ इ १. बिंदूदाबन उपचार करत असतांना उपचार करणार्‍या साधिकेने ‘स्वतःचे हात हे गुरुदेवांचे हात आहेत’, असा भाव ठेवल्याने आलेल्या अनुभूती : ‘शिबिरानंतर मी सरावासाठी आमच्या केंद्रातील एक साधिका सौ. अलका भागडे (आध्यात्मिक पातळी ६०, वय ६४ वर्षे) यांच्याकडे गेले होते. तेव्हा ‘भागडेकाकूंचा हात हा गुरुदेवांचाच हात आहे आणि माझे हातही गुरुदेवांचे आहेत’, असा भाव ठेवून मी (सौ. अनिता जमदाडे यांनी) सरावाला आरंभ केला. त्या वेळी भागडेकाकूंच्या डोळ्यांवर पुष्कळ झापड येऊ लागली. ‘गुरुदेवच हा सराव करून घेणार आहेत’, हे भावसूत्र सांगत असतांना काकूंना पुष्कळ ग्लानी येऊ लागली. त्या वेळी तेथे त्यांना ‘एक सूक्ष्म युद्ध चालू आहे. तसेच जसे बिंदूदाबन आरंभ केले, तसे त्या त्या बिंदूंवरील त्रासदायक शक्ती निघून जात आहेत’, असे त्यांना जाणवत होते. बिंदूदाबन झाल्यावर त्यांचा उत्साह वाढून गुडघेदुखीही अल्प झाली. त्या पायर्‍यासुद्धा भरभर उतरून खाली गेल्या. त्या दिवशी त्यांना पुष्कळच चैतन्य जाणवत होते. तसेच बिंदूदाबन करतांना मला आणि सौ. अलका भागडे यांना ‘हे हात गुरुदेवांचेच हात आहेत’, असे जाणवत होते. आमच्या समोरच गुरुदेवांची ‘दर्शन पुस्तिका’ होती, त्यावरील ‘गुरुदेवांचा चेहरा पुष्कळ लाल – गुलाबी रंगाचा झालेला दिसत होता. गुरुदेव आमच्याकडे पाहून स्मितहास्य करत आहेत’, असे आम्हा दोघींनाही जाणवत होते.’

३. शिबिराचा साधकांना झालेला लाभ

शिबिराच्या कालावधीत ज्या साधकांना अनेक वर्षांपासून काही शारीरिक त्रास होत होते, उदा. गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अशांवर अनेक औषध उपचारांसाठी ते लाखो रुपये खर्च करून घेत होते; मात्र बिंदूदाबन केल्यानंतर त्यांचे त्रास बर्‍याच प्रमाणात अल्प झाले आणि त्यांना आराम मिळाला.

सध्या तीव्र वेदना झाल्या, तर लगेचच वेदनाशामक गोळी घेतली जाते. ज्यामुळे त्वरित वेदना थांबतात; मात्र ‘बिंदूदाबन उपचारांनी कुठलीही गोळी न घेताही त्वरित वेदनाशमन होते’, हे रुग्ण साधकांनी प्रत्यक्ष अनुभवले.

(समाप्त)

– डॉ. दीपक जोशी, सनातन संकुल, देवद, पनवेल.’

(सर्व सूत्रांचा दिनांक १८.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक