गुरुदेवांप्रती भाव असलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा बोरी (गोवा) येथील चि. श्वेत बंगाळ (वय ५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. श्वेत प्रवीण बंगाळ हा या पिढीतील एक आहे !

बोरी (फोंडा, गोवा) येथील चि. श्वेत प्रवीण बंगाळ याच्याविषयी त्याच्या आईला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

चि. श्वेत प्रवीण बंगाळ
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वर्ष २०२० मध्ये ‘चि. श्वेत प्रवीण बंगाळ उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२५.५.२०२४)  

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१. जाणवलेले पालट

१ अ. हट्टीपणा आणि चिडचिड उणावणे : ‘पूर्वी श्वेत अतिशय हट्टी होता. त्याला कुठे बाहेर घेऊन गेल्यास तो चिडचिड करत असे आणि सांगितलेले ऐकत नसे. मागील वर्षापासून त्याच्यात पालट जाणवत आहे. तो बाहेर गेल्यास चिडचिड करत नाही. तो सांगितलेले ऐकतो. माझे नातेवाईक दिवाळीत घरी आले होते. त्यांनी मला त्याच्यातील हा पालट लक्षात आणून दिला.

१ आ. प्रार्थना करून सर्व देवावर सोपवल्यानंतर श्वेतच्या ऐकण्याच्या वृत्तीत वाढ होणे : पूर्वी तो पुष्कळ हट्ट करत असल्याने मला ताण येत असे. त्याला रागावले किंवा मारले, तरीही तो ऐकत नसे. माझ्या साधक नातेवाइकांनी मला त्याला रागवण्याऐवजी प्रार्थना वाढवायला सांगितल्या. मी प्रार्थना करून सर्वकाही देवावर सोपवल्यानंतर त्याच्या ऐकण्याच्या वृत्तीत वाढ झाली आहे. तो आधीच्या तुलनेत पुष्कळ प्रमाणात शांत झाला आहे.

१ इ. देवाप्रतीच्या भावात वृद्धी होणे : श्वेत पूर्वी सायंकाळी त्याच्या ताईच्या (कु. स्पृहाच्या) समवेत देवाच्या समोर बसून श्लोक आणि प्रार्थना म्हणत नव्हता. आता तो स्वतःहून देवाच्या समोर बसून श्लोक आणि प्रार्थना म्हणतो. तो शाळेत जातांना प्रतिदिन देवाला आणि तुळशीला नमस्कार करतो.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव

अ. मी त्याला ‘तू मी सांगितलेली कृती केल्यास प.पू. आजोबांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) आनंद होईल आणि ते तुला भेटतील’, असे सांगितल्यावर तो आनंदी होऊन लगेच ती कृती करतो.

आ. वर्ष २०२३ मध्ये ब्रह्मोत्सवाच्या वेळी ‘प.पू. आजोबा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) कधी येणार ?’, असे म्हणत तो झोपला. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांचे मैदानात आगमन झाल्यावर त्याला उठवायच्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘त्याला झोपेतून उठवल्यास तो रडेल’; मात्र त्याला ‘प.पू. आजोबा आले आहेत’, असे सांगितल्यावर तो अतिशय आनंदाने उठला आणि प.पू. आजोबांना शोधू लागला. त्याच्या चेहर्‍यावरील भाव आणि आनंद पाहून माझी अन् माझ्या समवेत असलेल्या साधक नातेवाइकांची भावजागृती झाली.

३. श्वेतमधील स्वभावदोष

लाजाळू आणि भित्रेपणा.’

– सौ. कल्याणी बंगाळ (चि. श्वेतची आई), बोरी, फोंडा, गोवा. (१०.३.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या http://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक