Maldives Ban Israel : मालदीवमध्ये इस्रायली नागरिकांच्या प्रवेशावर बंदी !

मालदीव सरकारचा निर्णय

माले (मालदीव) – मालदीव सरकारने इस्रायल-हमास यांच्यातील युद्धात पॅलेस्टाईनला पाठिंबा देत इस्रायलच्या पारपत्रावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पारपत्र नियमांमध्ये पालट करण्यात आल्यानंतर इस्रायलच्या नागरिकांना मालदीवमध्ये प्रवेश करण्यावर बंदी येणार आहे.

मालदीवचे गृहमंत्री अली इहुसान यांनी सांगितले की, पारपत्र कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी मंत्रीमंडळाने विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये देशातील वरिष्ठ अधिकारी आणि नेते यांचा समावेश आहे. तसेच पॅलेस्टिनी नागरिकांसाठी निधी उभारण्यासाठी इस्लामी देशांशी चर्चा करण्याचा निर्णयही मंत्रीमंडळाने घेतला आहे. ‘मालदीव विथ पॅलेस्टाईन’ (मालदीव पॅलेस्टाईन समवेत) या नावाने मोर्चाचेही आयोजन करण्यात येणार आहे. पॅलेस्टाईनशी एकता दाखवणे हे आमचे ध्येय आहे.

माले शहरामध्ये गेल्या १ महिन्यापासून इस्रायलच्या विरोधात निदर्शने चालू आहेत. ‘इस्रायली नागरिकांच्या मालदीव प्रवेशावर बंदी घालावी’, अशी मागणी मालदीवचे लोक करत आहेत. प्रतिवर्षी विविध देशांतून १० लाखांहून अधिक पर्यटक मालदीवमध्ये येतात, त्यांपैकी १५ सहस्र पर्यटक इस्रायली नागरिक असतात.

संपादकीय भूमिका

इस्रायलच्या शत्रू राष्ट्रांत आता आणखी एका इस्लामी देशाची भर पडली आहे. इस्रायल मालदीवला त्याच्या भाषेत उत्तर देईलच, यात शंका नाही आणि ते भारतियांनाही आवडेल !